कडेगांव दि.3(प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तयार केलेली भित्तीपत्रिका म्हणजे आपल्या मनातील भावतरंग शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे ठिकाण होय, असे प्रतिपादन साहित्यिक यशवंत पाटणे यांनी केले. ते आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे मराठी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘यशवंत’ या भितीपत्रिकेचे उद्घाटन साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.बापूराव पवार हे होते. यावेळी मराठी विभागाचे प्रा.कुमार इंगळे, प्रा.डॉ.नामदेव पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.यशवंत पाटणे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास हा महाविद्यालयीन जीवनात होत असतो. लेखन क्षमता विकसित होण्यासाठी भित्तीपत्रिकेसारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्या मनात उमटलेल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी भित्तीपत्रिका हि महत्वाचे साधन आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बापूराव पवार म्हणाले कि, आपल्या शब्दांच्या व्दारे नवनिर्मिती करुन इतरांना आनंद देण्यासाठी लेखन कौशल्य महत्वाचे आहे. विद्यार्थीना आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करण्यासाठी भित्तीपत्रिका हे माध्यम अतिशय महत्त्वाचे आहे. भित्तीपत्रिका ही नवनिर्मितीची पहिली पायरी आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभार प्रा.डॉ.नामदेव पाटील यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. हि भित्तीपत्रिका मराठी विभाग प्रमुख डॉ.बापूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ.नामदेव पाटील यांच्या सहकार्याने व प्रा. कुमार इंगळे यांच्या प्रयत्नातून मराठी विभागाच्या विद्यार्थीनी साकार केली.