सातारा दि. 30 : तरुणांनी कौशल्याचा विकास करुन उद्योग विश्वात गरुड झेप घ्यावी असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी केले. सातारा येथील आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या “फास्ट फूड स्टॉल उद्यमी” या प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख बोलत होते.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्रशांत पाटील यांनी संस्थेचे उद्दीष्ट व कार्य यांची माहीती दिली. सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योजकियदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आयडीबीआय आरसेटी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.
यावेळी शेख यांनी मार्गदर्शन करताना, प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणा दरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करावा आणि रोजगार निर्मिती करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनावे आणि उद्योजकीय अवकाशात गरूडभरारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव कथन केले.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे दिले जाणारे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विषयतज्ञ प्रशिक्षक प्रेमराज शिंदे,संस्थेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.