अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल मंगल कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरा बसवा नागरिकांची मागणी
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहरातील त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे विवाह सोहळ्यानिमित्त नवरीसाठी बनवलेले दागिने ठेवलेली पर्स बगलेत अडकवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत धारदार शस्त्राने कापून पर्समधील एकुण २०१००० रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्याविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत फिर्यादी शिवदास शामराव उगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० मे रोजी जामखेड येथील कर्जत रोडवरील त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे माझा मुलगा निखील याचा विवाह समारंभ आयोजीत केला होता. या विवाह सोहळा दुपारी १ : ३० वाजताचे सुमारास संपन्न झाला. यानंतर दुपारी २:३० वाजताचे सुमारास विवाह समारंभामधील ईतर धार्मिक विधी पार पडत असताना, माझी पत्नी माधवी हिने नवरी मुलीसाठी केलेले दागिणे तिला देण्यासाठी आपल्या बगलेमधील पर्समध्ये ठेवलेले दागिणे काढण्यास गेली असता, तिला दागिण्यापैकी एक चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व दोन भाराचे चांदीचे जोडवे आढळून आले नाहीत. ज्यावेळी पर्स तपासून पाहिली असता ती कशाचे तरी सहाय्याने फाडलेली दिसली. त्यावरुन आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयातील गर्दिचा फायदा घेवून पर्स कशाने तरी फाडून त्यात ठेवलेले सोन्याचे गंठण व चांदिचे जोडव्याचा जोड कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले आहेत.
यावेळी चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चार तोळे वजनाचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व १०००/- रु. किंमतीचे दोन भाराचे चांदिचे जोडवे असा २०१००० असा असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चोरून नेला आहे. यानुसार फिर्यादी शिवदास शामराव उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.