सातारा : अहिल्यादेवी होळकर म्हटलं की हातात पिंड घेऊन उभी असलेली राजमाता व पूजाअर्चा करणारी धार्मिक महिला असे चित्र उभे केले जाते.मात्र,त्या कर्तबदार महिला म्हणून लौकिक आहे.आधुनिक विचारधारेचा विचार करता त्यांचे विचार बहुजनांना अवगत होत आहेत. वास्तविक देशातील त्या उत्कृष्ट महिला राज्यकर्त्या होत्या.उत्कृष्ट प्रशासक होत्या.फक्य त्यांनाच पुण्यश्लोक म्हटले जाते.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व अंनिसचे कार्याध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ यांनी केले.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त राजवाडा येथे प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तेव्हा वीर-ऍड.धुमाळ मार्गदर्शन करीत होते.यावेळी चारुदत्त जोशी, हृषीकेश गायकवाड,धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यकर्त्यांनी कारभार कसा करावा ? याचे आदर्श उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय. अहिल्यादेवींचा राज्यकारभार हा आजच्या काळासाठी आदर्शवत आहे.
होळकर घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील होळ गावचे. त्यामुळे त्यांचे नाव होळकर पडले. अहिल्यादेवी यांचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांचा खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला. सासरे मल्हारराव आणि सासूबाई गौतमी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जडणघडण झाली. पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्यादेवींनी सती जाण्यास नकार देत मनस्मृतीविरोधात पहिले बंड केले. पुढे सासऱ्यांच्या निधनानंतर इंदोर संस्थानचा कारभार हाती घेत दुसरा विद्रोह केला. हे दोन्ही बंड त्यांच्या आयुष्याला आकार देऊन गेले. राज्यकारभार करताना त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला न्याय दिला. विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. वस्त्रोद्योगाची पंढरी निर्माण केली. त्यासाठी कारागीर घडविले. आज जी माहेश्वरी साडी प्रसिद्ध आहे, त्याचे सारे श्रेय अहिल्यादेवींकडे जाते. त्या काळात अनेक राज्यांत अराजकतेचे वातावरण होते. खून, मारामाऱ्या, बलात्कारासारख्या घटनांनी लोकांचे जगणे असह्य झाले होते. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र या उलट चित्र होते. लोक सुखी, समाधानी होते. राज्यात सर्वत्र शांतता होती. कायद्याचे राज्य होते. कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी अहिल्यादेवींनी न्यायपालिका निर्माण केल्या. सर्वांना समान न्याय होता. अहिल्यादेवी सर्व केसेस स्वत: ऐकून न्यायालयाकडे वर्ग करीत. न्यायाच्या बाबतीत त्या कठोर आणि कर्तव्यदक्ष होत्या. राज्यातील कोणालाही अहिल्यादेवींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडता येत होते. सर्व समाज सुखी, समाधानी असेल त्याकडे त्यांचा कटाक्ष होता. प्रजेचे आपल्या मुलाप्रमाणे पालन करणे हाच खरा राजधर्म आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी आपले काम फक्त इंदोर संस्थानपुरते मर्यादित न ठेवता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यत सामाजिक कार्य केले. शेतकऱ्यांसाठी तलाव, विहिरी काढल्या. नद्यांवर घाट बांधून त्याचे सुशोभीकरण केले. प्रवासी, यात्रेकरूंच्या निवासासाठी देशभर धर्मशाळा बांधल्या. कोल्हापूर जिल्ह्यात वडणगे, पट्टणकोडोली, अप्पाचीवाडी याठिकाणी बांधलेल्या धर्मशाळा आजही अहिल्यादेवींची आठवण करून देतात. गरिबांसाठी अन्नदानासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्या काळात राजाच्या मर्जीप्रमाणे प्रजेवर कर लावली जाई. अहिल्यादेवींनी मात्र प्रजेवर कराचा बोजा पडू नये म्हणून सर्वांत कमी कर लावला. या कराचा उपयोग त्या समाजहितासाठी करत. स्वत:साठी कराच्या या पैशाला हातही कधी त्यांनी लावला नाही. स्वत:साठी आणि धार्मिक कामासाठी त्यांचा वैयक्तिक खजिना होता. या खजिन्यामध्ये सुमारे १६ कोटी रुपये होते. पेशव्यांपेक्षा श्रीमंत असलेल्या या राजमातेचे घर मात्र अत्यंत साधे होते. माहेश्वरीत नर्मदा नदीकाठी त्यांचे छोटे कौलारू घर होते.
अहिल्यादेवींनी महिलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे. हुंडाबंदी केली. विधवांना मूल नसल्यास त्यांचा कुटुंबाच्या पैशावर हक्क नव्हता. अहिल्यादेवींनी हा कायदाच बदलला. शिवाय, विधवांना मूल दत्तक घेण्याचा कायदा केला. बालविवाहाला विरोध केला. त्याचा प्रचार- प्रसार केला. स्वत:च्या मुलींचा वयात आल्यानंतर आंतरजातीय विवाह लावून देऊन जाती-पातीला मूठमाती दिली. महिलांना युद्धकलेचे शिक्षण दिले. त्यासाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरू करून युद्धकलेत प्रावीण्य घेतलेल्या ५ हजार महिलांची फौज त्यांनी तयार केली. अहिल्यादेवींची विशेष सेवक महिलाच होती. अहिल्यादेवींचा एकही सरदार, मंत्री, सैनिक कधी त्यांना सोडून गेला नाही की, फितूर झाला नाही. त्याचबरोबर राज्यात घुसून अराजकता निर्माण करण्यास कोणीही यशस्वी होऊ शकले नाही. असे अमेरिकेतील संशोधक, इतिहासकार स्टीवर्ट गॉर्डन यांनी म्हटले आहे. यावरून त्यांच्या राज्यमध्ये किती अखंडता होती. हे सिद्ध होते. राजमाता स्वत: अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांची खुशालीची माहिती घेत. यामागे कर्मचाऱ्याप्रती त्यांची आत्मियता होती. अहिल्यादेवी या युद्धकलेत प्रवीण होत्या. तलवारबाजी, भालाफेकीत त्यांची कोणी बरोबरी करू शकत नव्हते, असा टिपू सुलतानने उल्लेख केला आहे. अनेक युद्धांचे अहिल्यादेवींनी स्वत: नेतृत्व केले. राघोबा पेशवे जेव्हा ५० हजार सैन्यांसह चाल करून आला, त्यावेळी अहिल्यादेवी महिला सैन्याची फौज घेऊन सामोरे गेल्या. मुत्सद्देगिरीने राघोबांना गुडघे टेकायला लावले. एक बहादूर योद्धा म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. अहिल्यादेवींच्या असामान्य कर्तृत्वाच्या गौरवार्थ केंद्र सरकारने १९९६ मध्ये त्यांच्या नावे टपाल तिकीट काढले.