सातारा/अनिल वीर : खिवशी,ता.पाटण येथील गावात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.तेव्हा संबंधितांनी त्वरित बंदोबस्त करावा.
खिवशी हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. त्यामुळे या गावात डोंगरामुळे बिबट्याचा वावर हा नेहमीचाच झाला आहे.
बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केला नाही. मात्र, गेल्या महिना भरात बिबट्याने गावातील दहा-बारा पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. तसेच शेळी बकरी या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत.सध्या शेती कामांना वेग असल्याने रात्री-बेरात्री शेतकरी घराबाहेर असतात. अशा वेळी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्यास जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.