सातारा : सातारा नगरपालिकेचा कारभार गेल्या पाच वर्षांत सातारकरांनी पाहिला आहे. काम शून्य आणि नुसताच भ्रष्टाचार, टक्केवारी असा उद्योग पालिकेत सुरू आहे. स्वत:चा पराभव दिसू लागल्यानेच त्यांना आता पालिका दिसू लागली आहे.
यातूनच स्वत:च्या स्वार्थापुरती चर्चेची वक्तव्य केल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाव न घेता खासदार उदयनराजेंवर खिंडवाडी येथे केली. त्यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी येथील सातारा बाजार समितीच्या जागेत सुरू केलेल्या जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, सुनील झंवर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”बाजार समिती ही माझी वैयक्तिक नाही. याठिकाणी माझा परवाना अथवा गाळा नाही किंवा मला येथे व्यवसाय करायचाय, असंही काही नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, की जागेची मालकी बाजार समितीची आहे आणि अधिकारही आहेत. या जागेशी निगडित असणाऱ्या कुळांशी आमचा काहीही संबंध नसून ही जागा आम्हाला शासनाने दिली असून, त्याची रक्कम आम्ही शासनास भरली आहे.
भूमिपूजनादिवशीही आम्ही कायदेशीर बाबी पडताळा, बघा, असे सांगत होतो. उगाच दादागिरी, दडपशाहीने काही होणार नाही. आम्ही त्याला भीक घालणार नाही,” अशा शब्दांत उदयनराजेंवर टीका केली. यानंतर त्यांनी बैलबाजार सुरू केल्यानंतर आगामी काळात करण्यात येणाऱ्या विकासरत्न अभयसिंहराजे भोसले
उपबाजार समितीत इतर व्यवसाय आणणार असल्याचेही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी सांगितले. याचवेळी त्यांनी महापुरुषांबाबत सर्वांनीच वक्तव्ये टाळण्याचे आवाहन केले.
त्या संचालकाचं का ऐकायचं?
जिल्हा बँक संचालकांच्या युरोप दौऱ्यावर उदयनराजेंनी टीका केल्याबाबत छेडले असता ते म्हणाले, ”तो त्यांचा विषय आहे. त्यांना काय वाटते. निवडून येऊन सुद्धा ते जिल्हा बँकेत मीटिंगला येत नाहीत. मग कशाला जिल्हा बँकेत आलेत. त्याऐवजी काम करणारा एखादा संचालक आला असता.
ड्रायव्हरच्या पोराच्या बदलीसाठी जिल्हा बँकेत येणाऱ्या संचालकाचं आम्ही का ऐकायचं,” असा सवाल करत शिवेंद्रसिंहराजेंनी नाव न घेता पुन्हा एकदा उदयनराजेंवर निशाणा साधला.