सातारा : सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) विविध दोन ठिकाणी कारवाईचा डबलबार उडवला. दोघांकडून लोणंद, ता.खंडाळा येथे 15 किलोचा गांजा व दोन कार तर सातार्यात एकाकडून बनावट देशी पिस्तूल जप्त केले. रविवारी केलेल्या या दोन्ही कारवाईत सुमारे 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गांजा प्रकरणात उपलब्ध मंगलेश भोसले (वय 35, रा. सोनगाव, ता. बारामती) व चेतन वामन जाधव (35, रा.जेजुरी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, लोणंद येथे काही संशयित गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी पोलिसांना पाहताच कारमधील संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ताब्यात घेऊन कारमध्ये पाहणी केली असता 14 किलो 684 ग्रॅम गांजा आढळला. संशयितांना ताब्यात घेऊन गांजा व दोन्ही कार जप्त करण्यात आले. दरम्यान, यातील उपलब्ध भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द बारामती, करकंब, माळशिरस, नातेपुते येथे गुन्हे दाखल आहेत.
दुसर्या कारवाईत पिस्टल प्रकरणी अक्षय सुरेश भोसले (वय 32, रा. तामजाईनगर, सातारा) याला अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मोळाचा ओढा येथे एकाकडे पिस्टल असून तो थांबलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षय भोसले याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 65 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आढळला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याकडील पिस्टल जप्त केली.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, फौजदार पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल भंडारे, मदन फाळके, पोलिस तानाजी माने, साबीर मुल्ला, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, सचिन ससाणे, मुनीर मुल्ला, प्रवीण कांबळे, हसन तडवी, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.