कराड : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगोंडा रायगोंडा पाटील (रा.मंगळवार पेठ, कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. साहिल साधमियाँ कादरी (रा. राजकोट, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांनी ११ जुलै ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कादरी याच्या कंपनीत ३० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. पैशांची गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षात ज्यादा परताव्यासह रक्कम परत देण्याचे आश्वासन साहिल कादरी याने दिले होते.
मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनी पैशाची मागणी सुरू केली. त्यावेळी साहिल कादरी याने उडवाउडवीची उत्तर देत मोबाइल बंद केला. त्यानंतर काही महिने तो फरार होता. काही दिवसांपूर्वी रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांचा साहिल कादरी याच्याशी संपर्क झाला.
त्यावेळी त्याने मी कोणतीही रक्कम देणार नाही, मला फोन करून पैसे मागितल्यास तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामगोंडा पाटील यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.