वडूज : पोलीस असल्याचा बहाणा करून भामट्याने वृद्धास लुटल्याची घटना वडूज-पुसेगाव मार्गावर वाकेश्वर गावच्या हद्दीत घडली. या गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गोडसेवाडी (ता.माण) येथील हणमंत शंकर कदम (वय ६४) हे काही कामानिमित्त वडूज येथे आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम दुचाकीवरून कदम यांच्या गाडीचा पाठलाग करीत आला. ‘तुम्ही गोडसेंचा खून केला आहे.
तुम्ही आरोपी वाटताय असे म्हणत तुम्हाला चेकिंग करायचे आहे. पुढे चेकिंग चालू आहे’ असे म्हणून अनोळखी व्यक्तीने कदम यांच्याजवळ असलेले १२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच डायरी असा ऐवज काढण्यास सांगितले.
‘ते मी बांधून तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवतो’ असे सांगून अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करून ऐवज लंपास केला. दरम्यान, या गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार एम. डी. हांगे करीत आहेत.