सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या अनावरणाचा सोहळा साताऱ्यात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमातून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांवरून झालेल्या वादावर प्रत्युत्तर दिलं आहे.
‘आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जी वाघनखं अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती ती भारतात आली आहेत. आपल्या देशात काही लोकांना वाद करणं हा एकमेव धंदा आहे. हा रोग आजचा नाही, त्याचा सामना छत्रपती शिवाजी महाराजांनाही करावा लागला’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘काहींच्या मेंदूत बुरशी आली आहे त्यांची बुरशी काढण्याचं काम करा. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही युग पुरुष म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. देव, देश आणि धर्मासाठी लढणारे आमचे मावळे आहेत. 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी रक्त सळसळतं. केवळ सातारा नाही तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला ही वाघनखं पाहता येतील’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.