गिरिस्थान प्रशालेतील विद्यार्थ्यांचा रिटेल विक्री कौशल्य प्रकल्प यशस्वी
महाबळेश्वर : शासनाच्या व्यवसाय शिक्षणातील रिटेल या विषयांतर्गत गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर मधील इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा स्टॉल लावून रिटेल विक्रीचे कौशल्य शिकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रिटेल विषय शिक्षक श्री. अभिषेक साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली सुट्टीचा सदुपयोग करत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य, ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, आणि जाहिरात अशा महत्त्वपूर्ण कौशल्यांचा अनुभव घेता आला.
इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी ४ स्टॉल लावून तब्बल १०० किलो झेंडूची फुले विकली. दिवाळी मध्ये झेंडूच्या फुलांच्या विक्री साठी बाजारपेठेत स्पर्धात्मक वातावरण असताना देखील विद्यार्थ्यांनी फुलांचे आकर्षक हार तयार करणे, जाहिराती चे पोस्टर्स, डिस्काउंट, स्पीकर वरून माहिती सांगणे अशा कल्पना वापरून ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाले. तसेच इयत्ता ९ वी व १० वी मधील विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या तयार करणे या उपक्रमातून तयार केलेल्या पिशव्या झेंडू च्या स्टॉल वर वापरून पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यात आला.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश बाळकृष्ण पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांच्या विक्री कौशल्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व भविष्यातील व्यावसायिक जगासाठी तयार होता येईल.”
गिरिस्थान प्रशालेचे प्राचार्य पी. आर. माने सर यांनी विद्यार्थ्यांना फुलांचा हार तयार करण्याचे प्रशिक्षण दिले तसेच उपक्रमाचे महत्व विशद करताना सांगितले, “या रिटेल प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यांचा पाया मजबूत करता आला. या उपक्रमाद्वारे त्यांनी विक्रीत लागणारे संवाद कौशल्य, नफा-तोटा हिशोब, आणि ग्राहकांशी उत्तम व्यवहार कसा करावा हे शिकले आहे.”
रिटेल विषयाचे उपक्रमशील शिक्षक अभिषेक साळुंखे सर यांनी विद्यार्थ्यांना या प्रोत्साहित करताना सांगितले की, “कोणताही व्यवसाय करण्यासाठी शरम न बाळगता प्रामाणिक पणे व कष्टाने कमवलेले पैसे हे अधिक मूल्यवान असतात. शासनाच्या रिटेल अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आम्हाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव देण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, वेळेचे व्यवस्थापन, आणि आकर्षक सादरीकरण यासारख्या अनेक कौशल्यांचा विकास झाला.”
सदर उपक्रमात इयत्ता ११ वी मधील युवराज कात्रट,तृप्ती जाधव,श्रुती घाडगे,आदित्य घाडगे, राज घाडगे,मंथन मोहिते, यांनी तसेच इयत्ता १२ वी मधील रितू जाधव, प्राची घाडगे, अपर्णा घाडगे,अश्विनी जाधव, साहिल घाडगे, सुदेश घाडगे, तेजस कात्रट, मयुरेश कांबळे,सुजल पवार, सागर रिंगे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तसेच यासाठी हणमंत जानकर या पालकांचे देखील सहकार्य लाभले. या प्रकल्पाला माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, पत्रकार,स्थानिकांनी तसेच पर्यटकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध ग्राहकांशी संवाद साधत झेंडू फुलांचे विक्री करताना स्वतःचे विक्री कौशल्य विकसित केले.गिरिस्थान प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.