नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत आरोप निश्चित झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच गौतम अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संरक्षण मिळालं आहे, असाही आरोप केला.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, गौतम अदानी यांनी भारत आणि अमेरिका दोन्ही देशातील कायद्यांचे उल्लंघन केले आहे हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांना आता अटक केलं पाहिजे, मात्र असं होणार नाही. 10-15 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांना अटक केलं जातं, मात्र अदानी मुक्तपणे फिरत आहेत.” पंतप्रधान मोदी अदानींच्या मागे उभे आहेत आणि त्यांचं संरक्षण करत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
अदानींना अटक करुन त्यांची चौकशी करण्यात यावी; त्याचप्रमाणे सेबीच्या प्रमुख माधवी बूच या अदानींच्या संरक्षक असून त्यांना पदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले की, “अदानींनी भारतीय तसेच अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा बचाव करत आहेत. ते अदानींसोबतच्या भ्रष्टाचारामध्ये वाटेकरी आहेत. या सगळ्या प्रकाराची जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करुन चौकशी करण्यात यावी.”
“एकीकडे तपास यंत्रणा दहा-पंधरा कोटींचा आरोप करुन विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात; मात्र, दोन हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अदानींची ते चौकशीही करत नाहीत. ज्या तपास यंत्रणा विरोधकांची तातडीने चौकशी करतात, त्या यंत्रणा तीच तत्परता अदानींच्या प्रकरणाबाबत का दाखवत नाहीत? तपास यंत्रणांनी गौतम अदानींना अटक करुन त्यांची चौकशी करावी,” असेही ते म्हणाले.
भाजपने प्रत्युत्तर
या आरोपाव भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधी यांच्याकडे निवडक लोकांची नावं आहेत. ते सातत्याने पत्रकार परिषद घेतात आणि मोदी व भाजपवर आरोप करण्याचा प्रयत्न करतात.” “राहुल गांधी खूप मोठी गोष्टी सांगत आहेत, असं बोलतात. 2019 मध्ये ते रफाल विमानांवर असेच बोलत होते. कोविड काळातही लसीवर पत्रकार परिषद घेत होते. भारत आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर हल्ला करणं ही राहुल गांधींची पद्धत आहे,” असा आरोप संबित पात्रा यांनी केला.
पात्रा पुढे म्हणाले, “एका कंपनीवर अमेरिकेत खटला सुरू आहे. कंपनी आणि कंपनीशी संबंधित खटल्यावर ते स्वतःची बाजू मांडतील, असं आमचं स्पष्ट मत आहे.” “हे संपूर्ण प्रकरण जुलै 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळातील आहे. आरोपांनुसार, या काळात छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडु आणि ओडिशा या भारतातील चार राज्यांमध्ये हे प्रकरण समोर आलं. त्या काळात या राज्यांमध्ये भाजप किंवा भाजपचा पाठिंबा असलेलं सरकार नव्हतं,” असं संबित पात्रा यांनी सांगितलं. “राहुल गांधींनी वारंवार मोदींची विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न त्यांनी पहिल्यांदा केलेला नाही, हे राहुल गांधींनी समजून घ्यावं,” असंही पात्रांनी नमूद केलं.