शाहूनगर : गोडोली (ता. सातारा) येथे झालेल्या ग्रामसभेत श्री भैरवनाथाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सव्वा महिना मांसाहार न करण्याच्या निर्णयाबरोबर विधवा प्रथाबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
गोडोली येथे श्री भैरवनाथ मंदिराचा हेमाडपंती स्वरूपात दगडी बांधकामात जीर्णोद्धार सुरू आहे.
या मंदिराचे काम काही दिवसांत पूर्ण होऊन लवकरच मंदिरामध्ये श्री भैरवनाथाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या नियोजनासाठी श्री भैरवनाथ देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, देवस्थानचे अध्यक्ष भरत संकपाळ, सचिव व्यंकटराव मोरे, खजिनदार सुनील मोरे- पाटील, विश्वस्त राजू मोरे, पोपटराव मोरे, विनोद मोरे, संदीप मोरे, दिनकर मोरे, पंडितराव मोरे, बाळू मोरे, प्रदीप मोरे, देवस्थानचे मानकरी शंकरराव मोरे- पाटील उपस्थित होते. यावेळी सुनील मोरे- पाटील यांनी ग्रामसभेमध्ये काही सूचना केल्या.
शेखर मोरे- पाटील यांनी यापुढे देखील सर्वांनी वादविवाद न करता राहावे, असे मत व्यक्त केले, तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
ॲड. बनकर यांनी मंदिराच्या परिसर सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार असून, त्याच्या आराखड्याचे काम करून लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी विश्वस्त अध्यक्ष भरत संकपाळ, सचिव व्यंकटराव मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोरे- पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनोद मोरे यांनी आभार मानले.
यावेळी मंगेश जगताप, अमोल नलावडे, विजय घुले, उमेश घुले, गणेश निकम, बाळासाहेब बनकर, विलास शिंदे, प्रवीण मोरे, विजय मोरे, सुभाष मोरे, नारायण साळुंखे, अनिल दौंडे, भैरू मोरे- पाटील, गणपत कामटे, रमेश कामटे, एकनाथ संकपाळ, धनंजय शिंदे, धनेश खुडे, गणेश बनकर, अभिजित मोरे, सुमीत मोरे, श्री. कुलकर्णी आदी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विधवा प्रथांनाही बंदी…
गावातील हेमा सुभाष मोरे यांनी ग्रामसभेत काही विषय मांडले. यावेळी त्यांनी गोडोली गाव शहरालगत असूनही विधवा महिलांना धार्मिक कार्यात सहभागी केले जात नाही, तसेच हळदी- कुंकू देखील करायला सहभागी केले जात नाही. या महिलांना समाजात वेगळी वागणूक दिली जाते. यामुळे आपल्या गावात देखील विधवा प्रथाबंदी ठराव करावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सर्व महिला व नागरिकांनी यास प्रतिसाद देत ठरावाला हात वर करून मंजुरी दिली.