अनिल वीर सातारा : कोणीतरी सांगितलं म्हणून नको स्वतःला काय आवडतं याचा विचार करून निश्चित ध्येय ठरवा. आपल्या ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. नक्कीच यश मिळेल.आवडत्या कामाचा कितीही त्रास झाला तरी त्यातून आनंदच मिळत असतो. रोज व्यायाम करून शरीर निरोगी ठेवा. नियमित वाचन व चिंतन करून त्यावर स्वतःचं मत तयार करा. मी स्वतः आजपर्यंत चार वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्या केल्या आहेत. ही आंगावरची खाकी वर्दी म्हणजे वाघाचं कातडं आहे. ती घातली की वाघाचं बळ येतं. कितीही वेळ काम कले तरी थकवा येत नाही. उलट प्रेरणाच मिळते. असे उदगार उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी काढले.
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय,वाईच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी परखंदी येथे झालेल्या कार्यक्रमात पो.अधिकारी बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक प्रा. अर्जून जाधव , राष्ट्रीय सेवा येजनेचे समन्वयक प्रा. हरेश कारंडे, भैरवनाथ सेवा शिक्षण संस्थेचे सचिव रमेश जाधव , राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते विराज शिंदे, सरपंच सौ.चित्रा जाधव, उपसरपंच मा.तात्याबा शिंदे व इतर मान्यवर होते.
विराज शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगला आभ्यास करून चांगले अधिकारी व्हावे व त्याद्वारे समाजाची सेवा करावी.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “परखंदी गावच्या ग्रामस्थांनी श्रमसंस्कार शिबीरासाठी जे सहकार्य व मदत केली ती इतर गावांसाठी प्रेरणा व दिशा देणारीच आहे. आमचे विद्यार्थी व महाविद्यालय विराज शिंदे , सरपंच, उपसरपंच , परखंदी ग्रामपंचायत तसेच हायस्कुल या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे.”
प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब कोकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. राजन करपे यांनी करून दिला. सुत्रसंचालन प्रा. शिवाजी जाधव यांनी केले.आभार समन्वयक प्रा. हरेश कारंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सौ. शीतल माने , प्रा. सौ. शाकुंतला पाळवदे , कर्मचारी चेतन तावरे व शिवंम सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परखंदी गावचे ग्रामस्थ , विद्यार्थी , शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.