नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकले;

0

कडेगावमधील धक्कादायक घटना

कडेगाव : नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला  चाकूने भोसकल्याची गंभीर घटना येथे घडली.
वंदना अधिकराव तांबवेकर-पाटील (सध्या कडेगाव) असे जखमीचे नाव आहे. अधिकराव पांडुरंग तांबवेकर-पाटील (वय ४८, शेवाळेवाडी येवती, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे
      

वैशाली प्रकाश पाटील (कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबवेकर-पाटील याला अटक केली. ही घटना काल दुपारी बारा वाजता घडली. पोलिसांनी माहिती दिली की, अधिकराव व वंदना यांच्यात घरगुती वाद झाल्याने वंदना गेल्या पाच-सहा वर्षांपासून कडेगाव शहरात बहीण वैशाली पाटील यांच्याकडे राहत आहेत.
        

अधिकराव सातत्याने, ‘आपल्या गावी शेवाळेवाडी येवती येथे राहूया,’ अशी वंदनाला विनंती करत होता. दोघांत यापूर्वीच्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे वंदना सासरी शेवाळेवाडी येवती येथे जात नव्हत्या. त्याचा राग अधिकरावच्या मनात होता.
            अधिकराव काल सकाळी कडेगाव येथे वंदना राहत असलेल्या ठिकाणी गेला. काहीएक न बोलता पाठीमागून येऊन वंदना यांच्या पाठीत चाकूने मारून त्यांना खाली पाडले. पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. वंदना गंभीर जखमी आहे. आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक व नातेवाईकांनी वंदना यांना कऱ्हाड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची नोंद कडेगाव पोलिसांत झाली असून उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here