सातारा : कोंडवे, ता. सातारा येथे सोमवारी (दि. 27) दुपारी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक जखमी झाले होते. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या कॅमेर्याचे फुटेज तपासून, तुषार प्रल्हाद धोत्रे (रा.सातारा) या संशयिताला काही वेळातच ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले.
सातारा-कास मार्गावरील जयमल्हार रिसॉर्ट येथे दि. 8 डिसेंबर 2024 रोजी बारबाला नाचत असताना किरकोळ कारणावरुन मारामारी झाली. या घटनेत धीरज शेळके याच्या डोक्यात बाटली फोडण्यात आली होती. तेव्हापासून दोन गटांमध्ये वाद धुमसत होता.
या पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांच्या शोधासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संशयित लवकरच ताब्यात येतील. याप्रकरणी सर्व शक्यता विचारात घेऊन विविध मार्गांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. विशेषत: स्कार्फ वापरणर्यांची चौकशी केली जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले.