देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथिल हॉटेल डबल ग्रॅज्युएटमध्ये दारुची नशा चढल्याने शेजारच्या टेबलवर पडला आणि त्याला उठविल्याचा राग आला अन् या आलेल्या रागातून अक्षय ऊर्फ गोट्याने चक्क अरुणच्या नाकाचा चावा घेतला. त्यावरही न थांबता दोन जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अक्षय ऊर्फ गोट्या चिंधे या तरुणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण काशिनाथ भोईर (वय ३६, रा. खांबे नेहारवाडी, ता. संगमनेर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अरुण भोईर हे त्यांचा मित्र पाराजी सयाजी जोरी यांच्यासह राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील हॉटेल डबल ग्रॅज्युएट येथे जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्या शेजारीच्या टेबलवर अक्षय ऊर्फ गोट्या चिंधे व इतर तिघेजण जेवणासाठी बसलेले होते.
दारुची नशा चढल्याने अक्षय ऊर्फ गोट्या चिंधे हा उठला व तो पायी जात असताना भोईर यांच्या टेबलावर पडला. तेव्हा अरुण भोईर यांनी त्याला उचलले. याचा अक्षय ऊर्फ गोट्या चिंधे याला राग आल्याने त्याने अरुण यांच्या नाकाचा चावा घेतला. तसेच त्यांना व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली.
या घटनेनंतर अरुण काशिनाथ भोई यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय ऊर्फ गोट्या चिंधे (रा. म्हैसगाव, ता. राहुरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११७ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे