ऑनलाइन कामाचे दाखविले आमिष; अकाउंटधारकावर गुन्हा
सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन काम शोधणाऱ्या महिलेस लिंकच्या माध्यमातून त्यासाठीचे आमिष दाखवत २१ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटधारकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याची तक्रार मंजुळा राहुल घाडगे (रा. दौलतनगर, करंजे) यांनी नोंदवली आहे.
दौलतनगर परिसरात मंजुळा राहुल घाडगे या कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहेत. डिसेंबर महिन्यात त्या मोबाईलद्वारे सोशल मीडियाच्या मदतीने ऑनलाइन काम शोधत होत्या. या वेळी त्यांना इन्स्टाग्रामवर एक जाहिरात पाहण्यास मिळाली. ती पाहिल्यानंतर मंजुळा घाडगे यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. यात कामाची माहिती देण्यात आली.
मेसेज करणाऱ्यास मंजुळा घाडगे यांनी नाव विचारले असता त्याने निरंजना असे सांगितले. यानंतर निरंजना असे नाव सांगणाऱ्या इन्स्टाग्राम अकाउंटधारकाने मंजुळा घाडगे यांना लिंक पाठविण्यास सुरुवात केली. यात लिंक ओपन करून त्यातील प्रॉडक्टला पसंती दिसल्यास पाठविलेल्या पैशांवर २० टक्के सवलत मिळेल, असे सांगितले.
यानंतर मंजुळा घाडगे यांनी विविध खात्यांवरून, तसेच इतर माध्यमातून २१ लाख ६८ हजार २०० रुपये विविध कालावधीत पाठवून दिले. हे पैसे पाठविल्यानंतर निरंजना असे नाव सांगणाऱ्या अकाउंटधारकाने त्यापोटी त्यांना ३० हजारांची सवलत म्हणून परत पाठवले. नंतरच्या काळात पैसे मिळणे बंद झाल्याने मंजुळा घाडगे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. २१ लाख ३८ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंजुळा घाडगे यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार निरंजना (पूर्ण नाव पत्ता नाही) इन्स्टाग्राम अकाउंटधारकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक डेरे हे करीत आहेत.