विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधन हे समाजोपयोगी असावे : प्रा. डॉ. अभिजित मुळीक

0

मायणी प्रतिनिधी : “विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधन हे समाजोपयोगी असले पाहिजे. संशोधक वृत्तीने निरीक्षण केले तर विद्यार्थ्यांना संशोधनाचे अनेक विषय आपल्या आजूबाजूला सापडतील. आज विज्ञानाच्या अनेक उपशाखांमध्ये तरुण संशोधकांची गरज आहे”, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अभिजित मुळीक (कराड) यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान विभाग द्वारा आयोजित ‘विज्ञान शाखेतील वैविध्यपूर्ण संशोधनाचे महत्त्व’ या विषयावरील कार्यशाळेत बीजभाषक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे होते.

       

संशोधनाच्या विविध क्षेत्रांचा परिचय करून देऊन ते पुढे म्हणाले, “संशोधनामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढे येऊन वेगवेगळ्या विषयांवर समाजोपयोगी संशोधन करावे. थाॅमस अल्वा एडिसनने शेकडो वेळा प्रयत्न करून प्रकाशाच्या दिव्याचा शोध लावला. तो आदर्श समोर ठेवून नवसंशोधकांनी स्वतःला संशोधनात झोकून दिले पाहिजे.” 

        अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे म्हणाले, “संशोधन हा उच्च शिक्षणाचा उद्देश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे वाढला पाहिजे. एखाद्या गोष्टीत अपयश आले म्हणून न थांबता संयम बाळगून पुढे जाता आले पाहिजे.”

        द्वितीय सत्रात प्रा. डॉ. प्रतीक कांबळे (सातारा) यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला दिलेले महत्त्व स्पष्ट केले. संशोधनासाठी वेगळा विचार करण्याची प्रयोगशील वृत्ती जोपासवी लागते, असेही त्यांनी सांगितले. 

       तिसऱ्या सत्रात दि ग्रे हॉर्नबिल नेचर क्लबचे सचिव पक्षिमित्र अंकुश चव्हाण यांनी  ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पक्षी निरीक्षणासंबंधी मार्गदर्शन केले. माळरानातील पक्षी व पाणथळीतील पक्षी यांचे वेगळेपण स्पष्ट केले. तसेच निसर्गातील पक्षी प्राणी टिकले तरच तरच मानवजात अस्तित्वात राहू शकेल, असे सांगितले. 

     

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. रोहिणी मगर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया कदम यांनी केले. आभार प्रा. श्रद्धा देशमुख यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. शिवशंकर माळी, प्रा. सिद्धेश्वर सपकाळ, प्रा. अपेक्षा घाडगे, प्रा. ममता दरेकर, प्रा. मनोज डोंगरदिवे, प्रा. समीना शेख, प्रा.प्रियांका कांबळे यांनी प्रयत्न केले. प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. सम्राट शिंदे, प्रा. सुरज पडळकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here