सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण’;

0

गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

सातारा : सध्याच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचे समोर येत आहे.
या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. ही मोहीम १५ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असणारी कित्येक कुटुंबे स्थलांतर करत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे. दगडखाण कामगार, ऊसतोड मजूर, वीटभट्टीवरील कामगार, बांधकाम करणारे कामगार यांचा यात समावेश आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थीच शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे दिसून येते.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये महसूल नगर विकास सामाजिक न्याय व विशेष साहाय्य महिला, एकात्मिक बिलाविकास, योजना कामगार विभाग, शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस व इतर शासकीय कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.

या सर्व विभागांच्या माध्यमातून सर्व्हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. ही मोहीम राबवत बालकांची गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी सांगितले.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. घरोघरी, बस स्थानक, झोपडपट्टी, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, वीटभट्टी, बाजारतळ, दगडखाणी, साखर कारखाने, बालगृह दत्तक संस्था यासह विविध ठिकाणी शाळाबाह्य सर्वेक्षण केले जाणार आहे. यामधून विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here