अनिल वीर सातारा : येथील शहीद भगतसिंग स्मृती समितीच्यावतीने शनिवार दि.२२ व रविवार दि.२३ रोजी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांच्या दि.२३ मार्च या शहीद दिनी होणाऱ्या आदरांजली कार्यक्रमाची सुरुवात दि.२२ रोजी सकाळी ८ वा.येथील प्रतापसिंह हायस्कुलमध्ये विनायक आफळे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. येथील टोपे वाडा येथे झालेल्या शहीद भगतसिंग स्मृती समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अमर शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम रविवार दि.२३ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी ९ वा. शहीद भगतसिंग चौक (बुधवार नाका ) येथे शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्यावतीने शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत राधिका पॅलेसच्या सभागृहात राज्यातून येणारे विविध कवी शहीद भगतसिंग यांच्या विचारांवर आधारित कविता सादर करून नशहिदांना काव्य आदरांजली वाहतील. सदर सादरीकरणामध्ये प्रथम, द्वितीय व त्रतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास प्रतिमा व पुस्तक आदी विविध बक्षिसे देण्यात येतील. तसेच उत्तेजनार्थ अनेक बक्षिसे दिली जातील. यावेळी कॉ. किरण माने मार्गदर्शन करणार आहेत.प्रमुख पाहुण्या म्हणून स्वराज्य क्रांती फौंडेशनच्या संस्थापक-चेअरमन सौ. वैशाली जाधव उपस्थीत राहणार आहेत.यावेळी सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि निवेदक ॲड. उमाकांत आदमाने उपस्थीत राहणार आहेत. सदरच्या काव्य स्पर्धेला परीक्षक म्हणून सौ. नीता चव्हाण, प्रा. डॉ. कांचन नलवडे व सौ. सुरेखा देशपांडे हे काम पाहणार आहेत.या कार्यक्रमाचे नियोजन सादिक भाई बागवान, प्रा. आनंद साठे, मनीषा साळुंखे आदी करणार आहेत.
सायंकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत राजवाडा येथील जवाहर उद्यान (गोल बाग ) येथे शाहीर भानुदास गायकवाड, कैलास जाधव आणि सहकाऱ्यांचा क्रांती गिते, समाज प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम व शहिदांच्या जीवनावर विविध वक्त्यांची भाषणे होतील.तेव्हा या सर्व कार्यक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने घेतलेल्या सहविचार सभेद्वारे केले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळे, दत्ता राऊत, प्रा. संजीव बोन्डे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा साळुंखे, साहित्यिक,कवी विनय आफळे,शशिकांत बडेकर, अनिल वीर, इतिहास अभ्यासक अरबाज शेख,मनोज चाकणकर, परवेज सय्यद,सलीम आतार, शिरीष जंगम आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.