सातारा प्रतीनिधी ; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने माध्यमांसमोर येऊन आरोप केले होते. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. विधानसभेत आणि विधान परिषदेत याचे पडसाद उमटले होते. आज या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिलेला अटक केल्याचे समोर आले आहे. सोबतच या महिलेने संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्त वकिलामार्फत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती .
ज्या प्रकरणी महिलेने खंडणी मागितली आहे ते प्रकरण 2017 मधील होते. याप्रकरणी न्यायालयाने 2019 मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पुन्हा या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्यपालांना पत्र लिहून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याआधीच या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे.
सोबतच दुपारी दोनच्या नंतर शिंदे गटाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी याच प्रकरणांमध्ये ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला वकिलांना सतत फोन करून भेटण्याबाबत विचारणा करत होती. त्यानंतर 17 मार्च रोजी तक्रार दाखल करून पोलीस व पंचासह महिलेस खंडणी प्रकरणातील तक्रारदार भेटले. त्यानंतर 19 तारखेला याबाबत पुन्हा बैठक झाली. 19 तारखेला झालेल्या बैठकीत महिलेने तक्रार मागे घेण्यासाठी तीन कोटींची मागणी केली. त्यानंतर महिलेने मंत्री गोरेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी पंधरा ते वीस मित्रांनी मिळून एक कोटी रुपये जमा केले. महिलेने पैसे घेताना कागदावर सही करून पैसे घेतले असल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली आहे या कटकारस्थानामध्ये प्रशासनाच्या हाताला मोठे मोठे मासे गळाला लागणार. असा दावा तक्रारदार विराज शिंदे यांनी केला आहे.