फलटण : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व श्रीमंत म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली हे फलटण तालुक्याचे दुर्दैव असल्याची घणघाती टीका माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
फलटण तालुक्यातील सहकारी संस्था रामराजेंनी अक्षरश विकण्यास काढल्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. फलटण तालुक्यातील तरुणांनी रामराजेंना आता घरी बसवण्याचं ठरवलं असल्याचे ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. श्रीराम सहकारी कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज केलं आहे. कारखान्यात काहीही शिल्लक ठेवलेले नाही. शिक्षणावर जर तुमचा पराक्रम असता तर तुम्ही फलटणची बारामती केली असती असा टोलाही त्यांनी रामराजेंना लगावला.
20 वर्षापूर्वीचा एकेकाळचा फलटणचा 1 लाख लिटरचा दूध संघ भंगारात जमा झाला आहे. जमीन विकली, मशिनरी विकायला काढली तो शून्य लिटरवर आणला आहे. श्रीराम कारखान्यातही मोठा भ्रष्टाचार केला आहे.
मालोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेवर निर्बंध लावले. तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ गायब आहे. मार्केट कमिटीत सहा महिन्यांचे पगार नाहीत. पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्ष भाड्यानं दिलं होतं असा आरोप सुद्धा रणजितसिंह यांनी केला.