येवला, प्रतिनिधी :
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेसुकी शाळेतील विद्यार्थिनी सई तिदार हिने राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात डंका गाजवला आहे. केवल फाउंडेशन आयोजित शिवजन्मोत्सव निमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य आणि भाषण स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेसुकी शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सई गोपाळ तिदार हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत येवल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिने अतिशय मुद्देसूद,प्रभावी आणि शब्दांची सुरेख मांडणी करत सर्वांचे लक्ष वेधले.
या यशाबद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ,गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीम.वाकचौरे,नागडे केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश उगले,शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती लोहकरे, वर्गशिक्षिका श्रीमती पगारे, शिक्षक श्री. घुले, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामा जाधव,सदस्य आणि तालुक्यातील सर्व शिक्षकांनी सईचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले.