पुसेगाव : महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता. खटाव, जि.सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून शासनामार्फत शाळेस ११ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती प्राचार्य विजय गायकवाड यांनी दिली.
या अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या पायाभूत सुविधा शासन निर्णयांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन -अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता चांगले आरोग्य, व्यावसायिक शिक्षणाची ओळख अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास, राष्ट्रीय एकात्मतेची भावना व्यक्तिमत्व विकासास चालना शासकीय विविध योजनांचा लाभ, या मुद्यांच्या आधारे शाळेचे मुल्यमापन करण्यात आले होते. शासकीय विद्यानिकेतनने वरील निकषांची पूर्तता करत यशाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच माझी विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्राचार्य विजय गायकवाड, गृहप्रमुख चंद्रकांत नरळे, कुलप्रमुख प्रकाश खेडकर तसेच शासकीय विद्यानिकेतनचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या यशाला गवसणी घालण्यासाठी परिश्रम घेतले. या यशाबद्दल कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी (माध्य) श्रीमती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मुजावर, शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी विभुते, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.