नागपुरातील सूर्यवंशी रिफायनरीमधून सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मालगावे आणि जगन्नाथ जावीर या दोघांकडून ५५ ग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीतील दोन म्होरके अद्याप फरार आहेत.
.
वैभव मालगावे याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्यवंशी रिफायनरीचे मालक सदाशिव सूर्यवंशी यांना फोन केला. त्याने स्वतःला त्यांच्या गावचा रहिवासी असल्याचे सांगितले. बिस्किट बनवण्याचे काम येत असल्याचे सांगून नोकरी मिळवली. सूर्यवंशी यांनी त्याला घरीच राहण्याची सोय केली.
घटनेच्या दिवशी सूर्यवंशी बाहेर गेले असताना, त्यांचा मुलगा लघवीसाठी गेल्याची संधी साधून आरोपीने ड्रॉवरमधून सोन्याची बिस्किटे चोरली. पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
या टोळीने दिल्लीत अशाच प्रकारची चोरी केल्याचे उघड झाले आहे. कोलकाता येथेही त्यांनी चोरी केल्याची शक्यता पोलिस व्यक्त करत आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.