[ad_1]
Rohit Sharma Virat Kohli ODI Cricket: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मासंदर्भात सूचक विधान केलं आहे. दोन आठवड्यांमध्ये या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गावसकरांनी या दोघांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील करिअरसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांसाठी जाण्याच्या काही दिवस आधीच विराट आणि रोहितने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी विराट आणि रोहितने कसोटीमधून निवृत्ती घेतली. मागील वर्षी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोघांनी एकाच दिवशी अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटलाही राम-राम केला होता. आता हे दोघे केवळ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सक्रीय दिसणार आहेत. दोघांनाही 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे.
चाहत्यांची निराशा करणारं विधान
भारताने नुकत्याच जिंकलेल्या 50 ओव्हर फॉरमॅटमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये विराट आणि रोहितने म्हत्त्वाचं योगदान दिलेलं. विराटने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केलेली तर रोहितने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढत भारताला विजय मिळवून दिलेला. त्यामुळे हे दोघे किमान एकदिवसीय क्रिकेटमध्ये तरी 2027 पर्यंत खेळतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. मात्र या चाहत्यांना निराश करणारं विधान गासकरांनी केलं आहे. रोहित आणि विराट 2027 च्या वर्ल्डकपमध्ये खेळतील का याबद्दल बोलताना गावकरांनी त्यावेळी या दोघांचंही वय हा फार मोठा निर्णय फॅक्टर ठरणार आहे, असं म्हटलंय. निवड समितीही या दोघांच्या वयाचा विचार त्यांची निवड करताना नक्की करेल, असंही गावसकरांनी म्हटलं आहे.
त्यांची निवड करताना काय विचार केला जाईल?
“विराट आणि रोहित दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधील मोठे खेळाडू आहेत. 2027 वर्ल्ड कपचा विचार करताना निवड समिती यापुढे संघ निवडेल. या दोघांच्या निवडीचा विचार करताना निवड समिती नक्कीच हे दोघे 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये संघात राहू शकतील का? हे नक्की तपासून पाहतील. हे दोघे ज्या पद्धतीचं योगदान आता देत आहेत तसं ते त्यावेळी देऊ शकतील का? याचाही विचार होईल. हा निवड समितीसाठी फार कठीण निर्णय राहणार हे निश्चित. निवड समितीला वाटलं की दोघेही खेळू शकतात तर नक्कीच हे दोघे आपल्याला संघात पाहायला मिळतील,” असं गावसकरांनी ‘स्पोर्ट्स टुडे’शी संवाद साधताना म्हटलंय.
वैयक्तिक मत व्यक्त करताना म्हणाले…
मात्र वैयक्तिक स्तरावर मत व्यक्त करताना गावसकरांनी, मला नाही वाटत रोहित आणि विराट दोघेही 2027 चा वर्ल्ड कप खेळतील, असं विधान केलं आहे. “मला नाही वाटत ते 2027 चा वर्ल्ड कप खेळतील. मी फार प्रमाणिकपणे हे सांगतोय. मात्र कोणास ठाऊक ते पुढल्या वर्षी आणि त्यानंतरही उत्तम कामगिरी करत राहिले आणि त्यांनी शतकांमागून शतकं लगावली तर देवही त्यांना संघातून वगळू शकणार नाही,” असं गावसकर म्हणाले.
विराटने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यापूर्वीच जवळपास आठवडाभर आधी रोहितने या दिर्घ फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलेलं.
[ad_2]