सातारा : संविधान वाचले तर देश वाचेल. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला आहे. मात्र, भाजपा गडबड घोटाळा करीत आहे. ईव्हीम मशीनच फोडण्यासाठी महिलांनी संघटित झाले पाहिजे. २०२४ ला पुन्हा सत्ताधारीच निवडून आले तर नक्कीच सत्यानाश अटळ आहे.असे प्रतिपादन सौ.संगीता शिंदे यांनी केले.
भारत मुक्ती मोर्चा महिला महापरिवर्तन यात्रेनिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या जाहीर सभेत सौ.संगीता शिंदे मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्षा ऍड. माया जमदाडे (राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ नवी दिल्ली) होत्या. यावेळी जोती मिसाळ, हजरा शिकलगार, शुभदा लोकरे, ओबीसी जिल्हा अध्यक्षा सुनिता लोहार, ओबीसी सातारा कार्याध्यक्षा शांता जानकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
शिंदे म्हणाल्या,”समाज संघटित होत नसल्याने सरकार अन्याय करीत आहे.मुळात सरकारच स्थिर नाही.”
श्रीमती ज्योती मिसाळ म्हणाल्या, “सुमारे ७५ वर्षे झाली इंग्रजानी जनगणना केली होती. तदनंतर झालीच नाही.सर्वच राज्यकर्त्यांनी मतासाठी ओबीसी व इतरांचा वापर करून घेतला आहे.ओबीसी’ची राष्ट्रीय संघटना एकही नाही.समस्या मुक्तीनेच गुलामी मुक्त होणार आहे.”
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माया जमदाडे म्हणाल्या, “विषमत्तेच्या चक्रातून बुद्ध व महावीर यांनी बाहेर काढले. चळवळ फक्त पुरुषांमुळे चालत नाही.बुद्धांनी भिख्खूनी संघ काढुन प्रबोधन केले होते. स्वाभिमानाने जगण्यासाठी महापुरुषांच्या विचाराने वाटचाल केली पाहिजे.” यावेळी अनेक महिलांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली.
सदरच्या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,ओबीसी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,संजय परदेशी, क्षीरसागर,शाहिर प्रकाश फरांदे, अनिल वीर व महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविकपर जिल्हा ओबीसी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता लोहार म्हणाल्या, “पशु-पक्ष्याची जनगणना केली जाते.मात्र, जातीनिहाय केली जात नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही.” संजय नितनवरे यांनी स्वागत केले. अमोल बनसोडे यांनी सूत्रसंचालन तर हंबीरराव बाबर यांनी आभारप्रदर्शन केले.
फोटो : सौ.संगीता शिंदे मार्गदर्शन करताना शेजारी महिला.(छाया-अनिल वीर)