पिंपळगांव बसवंत :
कामगार,कष्टकरी,शेतकरी, शेतमजूराच्या व्यथा वेदना त्याचा न्यायासाठीचा संघर्ष बुद्ध,कबीर,तुकोबा,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा व वसा लोककवी वामनदादा कर्डकांनी ताह्यात जपत आपलं अवघ आयुष्य मानवता-माणुसकीचा विचार आपल्या काव्य-कवण-गीत ,गझल शाहिरीतून मांडत भारतीय संविधानिक मूल्य विचार प्रचार प्रसार संवर्धित केला आहे.
शेतीमातीतील कष्टकऱ्यांचा संघर्ष,मानवी मतीची सांस्कृतिक अंगान मशागत करत वामनदादा कर्डक लिहीत तोच विचार-वारसा त्यांच्या १९ स्मृतिदिन “लोकशाहीर दिना”च्या निमित्ताने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान,नाशिक यांनी आयोजित शाहिरी अभिवादन सभेत जोपासला गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी गायक भास्कर अमृतसागर (धुळे) हे होते.
जीव आम्ही पेरला शेतात आहे।
भूक आम्ही मारली पोटात आहे।।
नाद माझा सोड! आता सोड! बाई
देह माझा गुंतला कष्टात आहे।
ह्या अतुलकुमार ढोणे, डेहणी (यवतमाळ) यांच्या गझलेने काळजाचा ठाव घेतला. येवला येथील गझलकार सचिन साताळकर यांनी “गजरे जरी फुलांचे या माळतात पोरी
पण बंधने युगांची का पाळतात पोरी ?
वाटेत खाचखळगे इतके परंपरांचे
प्रत्येक पावलाला ठेचाळतात पोरी
वाजे नकार घंटा त्यांच्या चहूदिशांनी
रस्ते तरी यशाचे धुंडाळतात पोरी
घाण्यास जुंपलेले आयुष्य हे तरीही
जन्मावरी स्वत:च्या पण भाळतात पोरी
अंधार दूर करण्या , दोन्ही घरे उजळण्या ,
होवून वात जीवन ह्या जाळतात पोरी
कर्जात गुंतलेल्या बापास वाचवाया
आगीसही सुखाने कवटाळतात पोरी
ह्या गझलेतून स्त्री जीवनाची व्यथा वेदना आणि शील संस्कार अधोरेखित केले. जात व जात व्यवस्था हि देशाला लागलेली कीड आहे ती नष्ट करण्यासाठी राजेंद्र देवरे,पुणे यांनी “तुझ्या माझ्या चव्हाट्यावर आलेल्या गोष्टी लोकांसमोर मांडू जात,धर्म, सगळ विसरून. मग बघू कोण स्वीकारत ते आपल्याला…
तुझ्या गर्भातून जन्मतील क्रांतिकारी विचारांचे स्वातंत्र्याचे धडे गिरवनारे मोकळ्या आकाशात स्वातंत्र्याची भरारी घेणारे पाखरं”. हि रचना दाद मिळून गेली.
कवी गायक भास्कर अमृतसागर यांनी लोकशाहीत राजकीय पक्ष नेते आपले वैचारिक अधिष्ठान कसे हरवून बसले आहेत व महापुरुष-सुधारकांच्या नावाचा जप करत कसे त्यांचे विचार पायदळी तुडवत आहेत हे सांगताना म्हणाले की,
बापाच्या या कामाईवरती,उड्या मारतोय टुणा टुणा।
आज भीमाचा बंगला फोडून बेट्या,बाप म्हणतोय कुणा-कुणा।।
कवयित्री कल्पना तेंभुर्णीकर (नागपूर),आरती खरात (अहमदनगर),गणेश निकम (चाळीसगाव) यांनी आप-आपल्या सामाजिक आशय-विषयाची काव्य,गीतातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. युट्युब लाईव्ह पद्धतीने संपन्न झालेल्या लोकशाहीर दिनास मोठ्या संख्येने प्रेक्षक श्रोत्यांनी सहभाग घेत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती कार्यास अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी केले.तांत्रिक साहाय्य मिलिंद पगारे यांनी केले.