‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड प्रतिनिधी : नांदेड नगरीतील तेजस्वी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रेरणास्थान बनलेली राजमाता जिजाऊ सृष्टी ही वास्तू केवळ भव्यतेसाठीच नव्हे, तर लोकजागृतीसाठी ओळखली जाते. या सृष्टीचे संकल्पक आणि सतत समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे प्रणेते अविनाश दादा कदम यांनी आता ‘शिवाजी कोण होता?’ या प्रेरणादायी पुस्तकाचे मोफत वाटप सुरू करून इतिहासजागराची एक नवी दिशा निर्माण केली आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर यांनी दिली.
राजमाता जिजाऊ सृष्टी या शक्तिपीठात भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भेटस्वरूपात हे पुस्तक देण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे – छत्रपती शिवाजी महाराजांचे सत्य, वैज्ञानिक आणि प्रेरणादायी विचार जनतेपर्यंत पोहोचवणे. हे केवळ पुस्तक नसून, इतिहासाचे बळ देणारे माध्यम आहे. या उपक्रमामुळे शिवचरित्राबाबत नव्या पिढीला खरी जाणीव होणार आहे.
अविनाश दादा कदम यांनी यापूर्वीही अनेक समाजहितैषी उपक्रम राबवत नांदेड परिसरात जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या कार्यशैलीमध्ये सातत्य, समर्पण आणि नावीन्य आहे. त्यामुळे त्यांना ‘सतत अनोखे आदर्शवत उपक्रम राबविणारे नेतृत्व’ म्हणून ओळखले जाते.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मारोती अण्णा, शिवाजी पावडे, राहुल धुमाळ, गजानन सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या स्तुत्य कार्यातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक नागरिकांनी जिजाऊ सृष्टीला भेट देऊन इतिहासाच्या नव्या प्रगल्भ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर यांनी केले आहे.