पैठण,दीं.६.(प्रतिनिधी) : पैठणच्या गागा भट यांच्याकडून रायगड येथे स्वराज्य स्थापनेचा छञपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला होता. त्या घटनेला दि.06, मंगळवार रोजी ३५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पैठण येथील गागाभट चौकात त्यानिमीत्ताने शिवप्रेमींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छञपती शिवाजी महाराज भोसले घराण्याच्या तिर्थोपाध्ये कुटुंबातील २०वे वंशज पुरोहित प्रकाश कावळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित नागरिकांनी यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करुन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळा यावर साहित्यिक बंडेराव जोशी यांचे व्याख्यान झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे, राम आहुजा, ओम संस्थेचे अभिषेक वेदी, दिनेश पारीख आदींची भाषणे झाली.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बाळासाहेब पाटील वस्तु संग्रहालयासाठी आवश्यक असलेली तिन एकर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. जागाही सहज उपलब्ध करून देता येत असतांना सुद्धा मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने या मागणीकडे दुर्लक्ष न करता जागा तात्काळ उपलब्ध करून देण्याची गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक व इतिहास प्रेमी संघटनांनी केली आहे. तसेच जुन्या पैठणमधील सातवाहन कालीन पालथ्या नगरीची अठ्ठावीस एकर केंद्र सरकारच्या मालकीची आहे. त्या जागेतील उपद्रव कारक, ञासदायक वेड्या बाभळीची झाडे त्वरित काढून तो परीसर संरक्षित करून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. वरील मागण्यांची महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाने व छञपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय व मराठवाडा केंद्रीय पुरातत्व प्रादेशिक विभागाने यात तातडीने लक्ष्य घालावे, अशी मागणी पर्यटक, इतिहास प्रेमी व नागरिकांनी केली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जुंजे, प्रसाद ख्रिस्ती, हरिभाऊ लहिरे, गणेश मुंढे, अमोल सवणे, जगन्नाथ जमादार, सागर नोपळघट, भाऊसाहेब पवार, शांतीलाल घटे, विठ्ठल शिंदे, मुरली साबळे, गोविंद शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
————————————
*चौकट*
शिवराज्याभिषेक सोहळ्यातील पैठणचे योगदान हजार वर्षांच्या कळ्याकुट्ट अंधार रात्रीनंतर उभ्या भारतवर्षाला महाराष्ट्राने रम्य पहाट दाखवली. आपला स्वतःचा राजा होऊ शकतो, आपले स्वतःचे सुराज्य निर्माण होऊ शकते, स्वराज्य निर्माण होऊ शकते या कल्पनेनेच अवघी महाराष्ट्राची जनता हर्ष भारीत झाली होती. शिवराज्याभिषेक हा काही फक्त एक सोहळा नव्हेच तो काही एक फक्त सोपस्कार नव्हता तर सामान्यजनांच्या आत्मबलाचा तो एक हुंकार होता. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात हा एक गौरवास्पद प्रसंग होता याच गौरवास्पद प्रसंगात पैठणचे असणारे योगदान हा इतिहासातील एक दुर्लक्षित पैलू आहे. या राज्याभिषेककार्याचे प्रमुख उपाध्ये किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली हा दैदिप्यमान राज्याभिषेक सिद्ध झाला ते गागाभट्ट (विश्वेश्वरभट्ट) जरी काशीहून आलेले असले तरी ते मूळ पैठणचेच. गागाभट्ट यांचे पूर्वज हे मूळ पैठणचे त्यांच्या पूर्वजांपैकी एक असणाऱ्या रामेश्वर भट्टांचे पैठणला गुरुकुल होते. पुढे त्यांनी द्वारका, मथुरा व काशी येथे गुरुकुल विद्यापीठे सुरू केली व ते पैठणून काशीला स्थलांतरित झाले. गागाभट्टांना लाभलेला हा प्रकांड विद्वत्तेचा वारसा त्यांनी पुढे चालवला गागाभट्टांचा व शिवरायांचा संबंध केवळ राज्याभिषेकाच्या निमित्ताने आला नाही तर आग्रा सुटकेच्या प्रसंगातही गागाभट्टांचे मोलाचे सहाय्य महाराजांना लाभले होते सभासदाच्या बखरी प्रमाणे “गागाभट्ट गोसायाने महाराजांना राज्याभिषेकाची भीड” घातल्याचे स्पष्ट लिहिलेले दिसून येते. राज्याभिषेक करणे तक्तशीन होणे ही सहजासहजी गोष्ट नव्हती. आक्रमकांच्या रेट्यामुळे सामान्य जनता राज्याभिषेक प्रयोग अक्षरशः विसरून गेली होती. त्याकाळच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे राज्याभिषेक परिपूर्ण असा होणे अत्यंत गरजेचे होते. मूळ पैठणच्या गागाभट्टांनी मग यासाठी कंबर कसली राज्याभिषेकाच्या पूर्वतयारीसाठी गागाभट्ट पैठणला आले. पैठणला त्यांचा वाडा होताच त्यांचे एक गुरुबंधू अनंत देवभट्ट चितळे हे त्या काळी पैठण मुक्कामी राहत होते. या गुरुबंधूंच्या व त्यांच्या पैठणच्या विद्वान सहकाऱ्यांच्या मदतीने मुख्य राज्याभिषेक सोहळा विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शास्त्रीय व धार्मिक बाबींच्या पूर्वतयारीसाठी या सगळ्यांनी कित्येक ग्रंथाच्या अभ्यासानंतर “तुला पुरुष दानविधी” व “राज्याभिषेक प्रयोग” या दोन ग्रंथांची पैठणला निर्मिती केली व राज्याभिषेकाची संपूर्ण सिद्धता व तयारी पैठण क्षेत्रिच पूर्ण केली. या सिद्धतेनंतर स्वतः थोरल्या महाराजांनी गागाभट्टांना रायगडी आणण्यासाठी पालखी व निवडक सैन्य पैठणला रवाना केले या सगळ्या लवाजम्या सोबत पैठणचे अनेक विद्वान सहकारी रायगडावर गेले व युगातील एका गौरवशाली सोहळ्याची केवळ साक्षीदारच नव्हे तर मुख्य स्तंभ झाले. शिवरायांच्या राज्याभिषेकात पैठण नगरीचा व पैठणच्या विद्वानांचा असणारा महत्त्वाचा वाटा हा महाराष्ट्राला भूषणास्पद असाच आहे