छत्रपती संभाजीनगर दि. ११ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत नागरीकांच्या मागण्यांसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) रस्त्याच्या प्रलंबीत मागण्या व कन्नड – चाळीसगाव घाटातील बोगदा होण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पावलं उचलू, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यसरकारकडून सर्वतोपरी मदत केली होती. धुळे सोलापूर महामार्ग दरम्यान कन्नड चाळीसगावमध्ये असलेल्या औट्रम घाटातील बोगदाबाबत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी यापूर्वी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. नवी दिल्ली येथे सचिव तथा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अध्यक्ष गिरीधर अरमाने यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगदा करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या बोगद्याला जवळपास सहा हजार कोटीचा खर्च असल्याने रद्द झाल्याचे चुकीच्या बातम्या पसरविण्यात आल्या, व यामुळे गैरसमज निर्माण होत आहे. मात्र या खर्चा मध्ये थोडीफार कपात करुन मराठवाडा खांन्देश पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गेल्या दहा वर्षापासुन राष्ट्रिय महामार्ग २११ संसदेत, लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित करुन जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी बोगद्याचाही विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंत्री महोदयांच्या समोर निदर्शनास आणुन दिले. या रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असुन, जो पर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तो पर्यंत ट्राफीक जामची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे असलेला हा परिसर पूर्णपणे वाहतुकीस सक्षम झालेला नाही.