सातारा – कृषी व ग्रामीण विकासात जिल्हा बॅंकेचे मोठे योगदान : राजू भोसले

0

ठोसेघर : राष्ट्रीयीकृत बॅंकांप्रमाणे फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंक कायम प्रयत्नशील आहे. बॅंकेच्या परळी शाखेत ग्राहकांना सुलभ आणि विनम्र सेवा मिळते. ठेव संकलनाबरोबर शैक्षणिक, वाहन, कॅश क्रेडिट, पीक आणि अन्य कर्ज वितरणात ही शाखा अग्रेसर आहे. जिल्ह्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासात जिल्हा बॅंकेचे मोठे योगदान असल्याचे मत राजू भोसले यांनी व्यक्‍त केले.

दिवाळीच्या मुहूर्तावर आष्टे, कुस बुद्रुक आणि आरे तर्फ परळी सोसायटीच्यावतीने सभासदांना परळी येथे नुकतेच लाभांश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बॅंकेचे संचालक सुरेश सावंत, विभागीय विकास अधिकारी श्रीमंत तरडे, सोसायट्यांचे चेअरमन, सचिव, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

राजू भोसले म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यामध्येही परळी शाखा आघाडीवर आहे. या योजनेतून रेवंडेसारख्या दुर्गम भागातील युवकाला परळी शाखेने 24 लाख रुपयांचे कर्ज वितरित करून, त्याच्या व्यवसायाला चालना दिली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा. नोकऱ्यांच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे. या भागातील सोसायट्यांचे कामही पारदर्शक आहे. सोसायट्यांकडून मिळणाऱ्या पीक कर्जाचा लाभ शेतकरी सभासदांनी घ्यावा. कर्जाची परतफेड मुदतीत करून संस्था सक्षमीकरणाला सहकार्य करावे.
यावेळी राजू भोसले यांच्या हस्ते बटण क्‍लिकद्वारे सभासदांच्या बॅंक खात्यांमध्ये लाभांशाची रक्कम वर्ग करण्यात आली. लाभांश वाटप झाल्याने दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया सभासदांनी व्यक्‍त केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि पीएमएफएमई योजनेंतर्गत रेवंडे येथील प्रमोद सीताराम भोसले यांना व्यवसायासाठी 24 लाख रुपयांचे कर्ज आणि आरे तर्फ परळी सोसायटीकडून ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात आले. बबन लोटेकर यांनी सूत्रसंचालन केले, शाखाप्रमुख अमित डावरे यांनी आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here