महाबळेश्वर : संथगतीने सुरू असलेल्या सुशोभिकरण विकास कामामुळे त्रस्त व्यापारी वर्गाने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
महाबळेश्वर येथे चाललेल्या विकास कामांचा दर्जा आणि काही कामांना गती मिळत नसल्याने वारंवार तक्रार करून देखील गलथान कारभार होत आहे. तसेच प्रशासनामार्फत देखील कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्याने आज येथील व्यापारी वर्गाने ठेकेदार सवानी व वास्तू विशारद जोशी यांच्याविरोधात ‘जोशी सवानी हटाव, महाबळेश्वर बचाव’ अशा प्रकारच्या घोषणा देत महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला.
उन्हाळी हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना ठेकेदाराकडून कोणतेच काम पूर्ण होत नसून अशा प्रकारचे सुशोभिकरण आम्हास नको अशी भूमिका घेतली आहे. तसेच ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे कोणतेच बिल काढू नये आदी मागण्या केल्या आहेत .