गोंदवले – गोंदवले खुर्द येथील सुरज शीलवंत याने सावकारकीच्या त्रासातून आत्महत्या केली होती. त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन संशयित आरोपींना संजय शेडगे आणि आदर्श कट्टे यांना दहिवडी पोलिसांनी काही दिवसापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर उर्वरित तीन संशयित आरोपींना देखील दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली.
यामध्ये गोंदवले बुद्रुक येथील आशुतोष आनंदराव कट्टे, रामदास उर्फ राम मालोजी कट्टे आणि शिवतेज सुरेश कट्टे यांचा समावेश आहे.
सुरज शीलवंत याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पालकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनंतर हे सर्व संशयित आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे काढून निदर्शने केली होती.या पाच जणांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.याप्रकरणी सर्व संशयतांना ताब्यात घेण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस हवालदार रामचंद्र तांबे,पोलीस हवालदार रवींद्र बनसोडे,पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी केली.