विरंगुळा म्हणून पर्यटनाला महत्व द्यावे !

0

 पहिला जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर 1980 रोजी आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. तेव्हा पासून दरवर्षी जगभरात विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने जबाबदार, शाश्वत आणि सार्वत्रिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यटन दिन घोषित केला आहे. याचा फायदा पर्यटकांना आणि त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांना होतो, तसेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते.

                मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था ही ‘जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग 1 वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम व इतर कारणांसाठी राहतात ते’ अशी पर्यटकांची व्याख्या करते. पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. पर्यटन ही संज्ञा प्रवास या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास हा शब्द लॅटिन भाषेतील ‘टोर्नोस’ या शब्दापासून आलेला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ ‘वर्तुळ’ किंवा ‘वर्तुळाकार’ असा आहे. याच शब्दापासून पुढे ‘वर्तुळाकार प्रवास’ किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला. एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे सहज शक्य झाले आहे. आवडच कारकीर्द झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात 25 टक्क्याने वाढ होते.

         

 जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट जगभरातील पर्यटनाचे महत्त्व वाढविणे आणि सामान्य जनतेला हे दर्शविणे आहे की, पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील परिणाम करते. इस्तंबूल, तुर्की येथे 1997 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण सभेने जागतिक पर्यटन दिनादरम्यान सहभागी म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक वर्षी यजमान देशाचे नामांकन करण्याचा निर्णय घेतला. अनेक देशांची पर्यटन मंडळे जागतिक पर्यटन दिनाच्या उत्सवात सामील आहेत, जे त्यांच्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आकर्षक ऑफर लाँच करतात. गेल्या काही वर्षांत कोरोना महामारीमुळे पर्यटनाला आव्हाने होती. मात्र गेल्या वर्षभरात त्यात आश्चर्यकारक वाढ झाली आहे.

          पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने पर्यटन हे क्षेत्र उपयुक्त आहे. ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक निती नियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. निवास, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येते.

           स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते. या विभागात आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन, मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात. हा उपलब्ध पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करतो. त्याच्या सहकार्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करण्यास मदत होते. पर्यटन मंत्रालय गाईडला (मार्गदर्शक) मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. हा परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे कारण तो प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्त्वाचा दुवा असतो. टूर ऑपरेटर्स हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. टूर गाईड म्हणून अनुभव आल्यानंतर या पदावर काम करता येते.

         ट्रॅव्हल एजन्सी यांचे अनेक लोक ग्राहकांना एजन्सीशी जोडतात. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात. पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला सध्या आहे. तसेच, विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.

              

2018 ला ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. या वर्षभरासाठी पर्यटनदिनासाठीचा विषय म्हणजे “पर्यटन आणि नोकऱ्या” सर्वांसाठी चांगले भविष्य हा होता. भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारताने प्रथमच जागतिक पर्यटन दिन-2019 उत्सवाचे आयोजन दिल्लीमध्ये केले. भारत त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांना विविध पाककृती, साहसी ठिकाणे, संगीत, इतिहास, भाषा इत्यादी देण्याची क्षमता आहे. जागतिक पर्यटन संस्थेने पर्यटन आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व, पर्यटनासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्याशी संबंधित नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आहे.

            पर्यटन मंत्रालयाने पर्यटनाच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय धोरणांची आखणी केली आहे. या प्रक्रियेत मंत्रालय विविध केंद्रीय मंत्रालये, संस्था, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसह या क्षेत्रातील अन्य भागधारकांशी सल्लामसलत व सहयोग करतात. ग्रामीण, समुद्रपर्यटन, वैद्यकीय आणि इको टूरिझम यासारख्या पर्यटन उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन मंत्रालयाने भारताच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देऊन अतुल्य भारत मोहीम कायम ठेवली आहे. दरवर्षी जागतिक पर्यटन दिनाची थीम पर्यटन पुनर्विचार ही आहे. महामारीनंतर आलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम पर्यटनावर झाला. अशा स्थितीत पर्यटनात सहज शक्य तितके नवीन बदल करून या उद्योगाला पुन्हा चालना मिळू शकेल अशा गोष्टींकडे यंदा लक्ष दिले जाणार आहे. सर्वांना आज जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा !

प्रविण बागडे ,नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here