रोबोटने केले डॉक्टरांचे स्वागत, फोटोही काढला…!!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
पोटविकारांसंबंधी दोन दिवसीय ‘जीआय व्हिजन २०२४’ परिषदेचे शनिवारी उद्घाटन झाले. ही परिषद शहरात झालेल्या आजपर्यंतच्या परिषदांपेक्षा काहीशी वेगळी ठरली. कारण या परिषदेसाठी येणाऱ्या डॉक्टरांचे एका रोबोटने आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. इतकेच काय डॉक्टरांचे फोटो काढून अवघ्या काही मिनिटांत ते त्यांच्या व्हॉट्सअॅपवरही पाठवून दिले. :
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि केअर सिग्मा हॉस्पिटल यांच्यावतीने ‘जीआय व्हिजन २०२४’ या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जीआय) एंडोस्कोपी विषयावरील परिषदेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, केअर हॉस्पिटलचे ग्रुप सीईओ जसदीप सिंग, परिषदेचे अध्यक्ष डॉ. उन्मेष टाकळकर, मनीषा टाकळकर, डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, डॉ. केनेथ बिनमोलर, डॉ. जी. व्ही. राव, घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, ‘आयएमए’चे सचिव डॉ. विकास देशमुख, डॉ. मारोती पोटे, डॉ. रितेश सोनी, डॉ. शशिकांत अगसरे, डॉ. प्रफुल्ल जटाळे, डॉ. आशिष गांधी, डॉ. विनीत कहाळेकर आदी उपस्थित होते.
कसा आहे हा रोबोट?
वैद्यकीय क्षेत्रात रोबोट, ‘एआय’ने काय बदल होईल, याची झलक या परिषदेत पाहायला मिळाली ‘मिनी’ नावाचा रिसेप्शन रोबोट येणाऱ्या डॉक्टरांना परिषदेच्या मुख्य सभागृहापर्यंत घेऊन जात होता. हा रोबोट रुग्णालयातील डॉक्टरांच्या कक्षापर्यंत घेऊन जाणे, कोणता विभाग कुठे आहे, हे सांगण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. केनेथ बिनमोलर यांनी अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या उपचारांविषयी मार्गदर्शन केले. एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड ही पाचक (जठरांत्रीय) आणि फुफ्फुसाच्या रोगांचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून, आधुनिक उपचारांनी एका दिवसात रुग्ण घरी जाऊ शकत असल्याचे ते म्हणाले. डॉ. उन्मेष टाकळकर म्हणाले, परिषदेतील सत्रे ही सहभागी डॉक्टरांना कौशल्य आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी उपयुक्त अशी तयार केलेली आहेत. रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे निश्चितच उपयुक्त ठरेल.