पैठण (प्रतिनिधी):पैठण औद्योगिक परिसरातील सेंट पॉल हायस्कूल येथे प्रजासत्ताकदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यघटना लागू होवून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेत आठवडाभर वेगेगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी चित्रकला, भित्तीपत्रके तसेच निबंधलेखन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये मोठया संख्येने व उत्साहाने सहभाग नोंदविला. यासोबतच मतदार दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात हिरीरीने सक्रिय सहभागी होत मतदारांची जनजागृती करण्यात विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला.
प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक बाळासाहेब थोटे यांनी लेझिम पथक तयार करण्यात मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवायती दाखवून तसेच देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी आपल्या संविधानातील प्रस्तावणेच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेवून भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून तयार होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल शेख व जयेश पंजावणी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी बोडखे हिने केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची मोठी उपस्थिती होती.