कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी ,३० भाविक मृत्युमुखी !

0

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी माध्यमांना सांगितलं, “महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २५ व्यक्तींची ओळख पटली आहे.”

या घटनेचं कारण सांगताना ते म्हणाले, “आखाडा परिसरात बॅरिकेड्स लावलेले होते. त्यापैकी काही बॅरिकेड तुटले. अनेक भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट बघत घाटावरच झोपले होते आणि त्याचवेळी इतर भाविक मोठ्या संख्येने त्याठिकाणी पोहोचले. पायाखाली कोण झोपलं आहे हे ते बघू शकले नाहीत आणि अशापद्धतीने ही घटना घडली.” सरकारने कसलाही व्हीआयपी प्रोटोकॉल राहणार नाही अशा सक्त सूचना दिलेल्या होत्या आणि बुधवारी कसलाच व्हीआयपी प्रोटोकॉल लागू केलेला नव्हता.

प्रयागराजमधील एका डॉक्टरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं की, या घटनेत किमान 15 लोक मृत्युमुखी आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. या डॉक्टरांनी एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. कुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्नानाच्या ठिकाणी मौनी अमावस्येमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, “प्रयागराज येथील महाकुंभात झालेला अपघात दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो.” “स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे,” अशीही माहिती मोदींनी ‘एक्स’वरून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here