30 जानेवारी : जागतिक कुष्ठरोग निवारण दिन 

0

जागतिक कुष्ठरोग दिन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो . हा दिवस कुष्ठरोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो . भारतात हा दिवस 30 जानेवारीला साजरा केला जातो .  जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यामागचे उद्देश :  कुष्ठरोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे , कुष्ठरोगाविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणे , कुष्ठरोग  संबंधित कलंक आणि भेदभाव संपविण्याचे आवाहन करणे हे आहेत .

            जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्याची सुरुवात 1954 मध्ये झाली होती . या दिवसाची स्थापना फ्रेंच मानवतावादी राउल फोलेरू यांनी केली होती . 

       कुष्ठरोगाबद्दल अधिक माहिती :  कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे . कुष्ठरोगाला हॅन्सन रोग असेही म्हणतात . यास इंग्रजीत लेप्रसी असे म्हणतात  . कुष्ठरोग हा जगातील सर्वात जुन्या नोंद झालेल्या रोगांपैकी एक आहे .  हा आजार एक प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो . कातडीबरोबरच हा आजार चेतातंतूंवरही दुष्परिणाम करतो . कातडीवर न खाजणारे चट्टे व बधिरता येते . नंतरनंतर तळव्यावर व्रण होणे , नाक बसणे , हातापायाची बोटे आखडणे किंवा वाकडी होणे , इत्यादी लक्षणे कुष्ठरोगात आढळतात . हा आजार आनुवंशिक नाही . हा आजार सांसर्गिक प्रकारच्या रुग्णांच्या संसर्गाने एकमेकांत पसरतो . यावर आता प्रभावी औषधे निघाल्याने बहुतेकांचा आजार सहा महिने ते दीड वर्ष या काळात पूर्ण बरा होतो . त्यासाठी कायमचे नुकसान होण्याआधीच या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून उपचार व्हायला पाहिजेत .

        कुष्ठरोग हा आजार मायको लेप्री नावाच्या जिवाणूंमुळे होतो . हे जंतू खूप सावकाश वाढतात . म्हणून हा आजारही खूप सावकाश वाढतो . ( 2 ते 5 वर्ष लागू शकतात ) या आजाराचा प्रसार खूपच मर्यादित असतो . मुळात 98% व्यक्तींना या आजाराविरुध्द उत्तम प्रतिकारशक्ती असते . म्हणजे फक्त 2% जणांना हा आजार होऊ शकतो . त्यातही केवळ सांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोग-बाधित व्यक्तींकडूनच हे जंतू पसरू शकतात . उपचार सुरु केल्यावर महिन्याभरातच हे रुग्ण असांसर्गिक होतात .

         सांसर्गिक कुष्ठ रुग्णांच्या श्वसनावाटे हे जंतू पसरतात . श्वासोच्छ्वासातून जंतू तर पसरतातच , पण शिंकण्या खोकण्यातून विशेष संख्येने जंतू उडतात . क्षयरोगाप्रमाणेच कुष्ठरोग पसरतो त्वचेतून संपर्काने तो पसरत नाही .

          राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम  : 

          राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम भारत सरकारने सुरू केला . भारतातील 1954 – 55 मध्ये  मल्टी ड्रग थेरपी ( एम डी टी ) 1982 पासून मोठ्या प्रमाणावर वापरात आली आणि 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आला . हा लोकसंख्येतील संसर्गाचे प्रमाण कमी करून आणि संसर्गजन्य स्त्रोत कमी करून रोग नियंत्रित करण्यावर आधारित होता . अशा प्रकारे रोगाच्या प्रसाराची साखळी खंडित होते . हा कार्यक्रम सुरुवातीला स्थानिक जिल्ह्यांमध्ये घेण्यात आला आणि 1993-94 पासून जागतिक बँकेच्या सहाय्यकांसह देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार करण्यात आला . केंद्रीय कुष्ठरोग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था संस्था  चेंगलपट्टू , रायपूर , गौरीपूर आणि आस्का येथे तर प्रादेशिक कुष्ठरोग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था  स्थापन करण्यात आल्या . याव्यतिरिक्त  आग्रा येथे एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले . देशात रोगाचा दर कमी करण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे  .

        डिसेंबर 2005 मध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य धोरणात सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट भारताने साध्य केले , ज्याची व्याख्या प्रति 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी केस अशी आहे .

 दृष्टी : “कुष्ठरोगमुक्त भारत” हे  व्हिजन आहे.

 ध्येय  : कुष्ठरोगमुक्त भारत हे ध्येय म्हणजे एकात्मिक आरोग्य सेवा प्रणालीद्वारे , रोग बरा झाल्यानंतर अपंगत्वाची काळजी घेण्यासह , लोकसंख्येच्या सर्व घटकांना दर्जेदार कुष्ठरोग सेवा मोफत उपलब्ध करून देणे हे आहे .

         उद्दिष्टे :   उपराष्ट्रीय आणि जिल्हा स्तरावर 1 / 10,000 पेक्षा कमी लोकसंख्येचा प्रसार दर कमी करणे .   राष्ट्रीय स्तरावरील नवीन प्रकरणांमध्ये अपंगत्व कमी करणे  इत्यादी आहेत.

            धोरण :  उपरोक्त उद्दिष्टे साध्य करण्यासाठी , मुख्य धोरणे खालीलप्रमाणे आहेत : 1)  सामान्य आरोग्य सेवा प्रणालीद्वारे एकात्मिक कुष्ठरोगविरोधी सेवा   2)  नवीन कुष्ठरुग्णांची लवकर तपासणी आणि पूर्ण उपचार  3)  प्रकरणे लवकर शोधण्यासाठी घरगुती संपर्क सर्वेक्षण करणे  4)  कुष्ठरोगाच्या प्रकरणांचा शोध आणि उपचार वेळेवर पूर्ण करण्यात मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्याचा (आशा ) सहभाग   5) अपंगत्व प्रतिबंध आणि वैद्यकीय पुनर्वसन सेवांचे बळकटीकरण   6) आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे आणि ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्र / सामुदायिक आरोग्य केंद्र येथे सखोल देखरेख आणि पर्यवेक्षण करणे इत्यादी आहेत .

             कुष्ठरोगाचे निदान आणि उपचार : – निदान आणि उपचारासाठी मोफत सेवा (मल्टी ड्रग थेरपी) प्राथमिक आरोग्य केंद्रे , सरकार यासारख्या सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांद्वारे प्रदान केल्या जातात . देशभरातील दवाखाने , सीएचसी , डीएच आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे ही सुविधा मिळते .  गुंतागुंतीची प्रकरणे,  पुढील व्यवस्थापनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविली जातात . सर्व औषधे , निदान आणि सर्जिकल / नॉन-सर्जिकल  कुष्ठरोगाच्या सर्व रूग्णांना विनामूल्य पुरविली जातात .

       क्षमता निर्माण  –  कुष्ठरोगाचे निदान आणि व्यवस्थापनासाठी पुरेशी कौशल्ये विकसित करण्यासाठी दरवर्षी वैद्यकीय अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आरोग्य पर्यवेक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आशा या सामान्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जाते .  

             महाराष्ट्रात कुष्ठरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे . 1 जानेवारी 19  ते  31 डिसेंबर 23 या कालावधीत महाराष्ट्रात 83281 कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे . कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात . निधीही खर्च केला जातो , त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे  , म्हणून हा लेखनप्रपंच !

संकलन  :  चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके ,तहसीलदार, बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here