वडूज : वडूज नगरपंचायतीच्या सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच नगराध्यक्षा सौ. मनीषा रवींद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
यावेळी काही सदस्यांनी त्यांच्यावर मनमानी व निष्क्रियतेचे केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. तसेच कचर्याचा गंभीर विषय असल्याकारणानेच राजीनामा लांबल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सौ. काळे यांनी सांगितले की, आपण स्वत:च्या ताकतीवर प्रभाग क्र. २ मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदावर काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. मात्र, या पक्षाबरोबर राहून विकास कामे होत नसल्याच्या कारणावरुन भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरामध्ये आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. त्यामध्ये विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे ५ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजना मे २०२३ रोजी ४० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना ऑक्टोंबर २०२३ मध्ये ५ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजना डिसेंबर २०२३ मध्ये ३० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना फेब्रुवारी २०२४ मध्ये १ कोटी ४५ लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना मार्च २०२४ रोजी ५ कोटी ६० लाख, जिल्हा नगरोत्थान योजना १ कोटी ९५ लाख, नागरी दलितेत्तर योजना ७२ लाख ५० हजार, ८९ लाख १० हजार, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना १ कोटी ४६ लाख, अमृत २.० पाणी पुरवठा योजना ४६ कोटी ६५ लाख, अग्निशामक योजना १ कोटी ७१ लाख, स्वच्छ सर्वेक्षण १ कोटी ६७ लाख, १५ वा वित्त आयोग ३ कोटी ४६ लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२४- २५ मध्ये ४० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२५ रोजी ९० लाख, विशिष्ट नागरी सुविधा ९ कोटी, भुयारी गटार योजना ५ कोटी २० लाख, जिल्हा नगरोत्थान योजना २०२४- २५- २ कोटी ५ लाख, नागरी दलितेत्तर योजना २०२४- २५ ला १ कोटी ३ लाख, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२४- २५ ला १ कोटी १ लाख अशी एकूण १४५ कोटी ७ लाख रुपयांची कामे आपल्या कार्यकालात झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘आरोप करणाऱ्यांची कीव वाटते’
कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. यापैकी अनेक महत्वाच्या कामांची भूमिपूजने, उद्घाटन शुभारंभ, लोकार्पण सोहळे पक्षाचे नेते ना. जयकुमार गोरे यांच्यासह बहुतांशी नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर कार्यकर्ते तसेच जनता जनार्दनाच्या उपस्थितीत पार पडले आहेत. असे असताना आपल्यावर निश्क्रियतेचे आरोप करणार्यांची कीव करावीशी वाटते, असेही सौ. मनीषा काळे यांनी यावेळी सांगितले.
व्यक्तिगत आरोपाबद्दल नाराजी
ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करत होतो. लोकशाहीमध्ये सर्वांनाच पद मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, पदाची महत्वकांक्षा व वैयक्तिक लालसेपोटी काही सदस्यांनी टोकाची भूमिका घेत आपणाविरोधात व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.