सातारा : राज्यातील साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच अवकाळी पाऊस झालाय. तर छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा आणि जालन्यात अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
या राज्यासोबतच मुंबईत देखील अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासूनच हवेत आणि वातावरणात काहीसा बदल झाला होता. कडाक्याच्या उन्हात आभाळात मळभ दिसत होती.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सांगलीच्या खानापूर, तासगाव, वाळवा या तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
साताऱ्या जिल्ह्यातील कराडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गाऱ्यांचा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान खात्याकडून नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.