महाबळेश्वर, दि. १४: आगामी २ मे ते ४ मे दरम्यान महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महापर्यटन महोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. विविध ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, वेण्णा लेक येथे सुरु असलेले बांधकाम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आहे. महाबळेश्वर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून, सुट्ट्यांच्या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. वेण्णा लेक बोट क्लब हे पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सध्या सुरु असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे वेण्णा लेक पर्यटकांनी गजबजलेले आहे.
महापर्यटन महोत्सवाची तयारी वेळेत पूर्ण करायची असल्याने वेण्णा लेक येथे जांभा दगडाचे दर्जेदार बांधकाम सुरु आहे. मात्र, सुट्यांचा कालावधी असल्याने पर्यटकांची वाढती गर्दी आणि नौकाविहारासाठी ये-जा करणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जांभा दगड ठेवण्यात आले होते. याचा उद्देश केवळ पर्यटकांना तात्पुरता आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे हा होता.
मुख्याधिकारी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, संबंधित वृत्त पोर्टलने कोणतीही खातरजमा न करता आणि अर्धवट माहितीच्या आधारे हे चुकीचे वृत्त प्रसारित केले आहे. यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नगरपालिका प्रशासनाकडून सुरु असलेले सर्व काम उच्च प्रतीचे आणि नियमांनुसार होत आहे.
योगेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महापर्यटन महोत्सवाची तयारी व्यवस्थितपणे सुरु असून, वेण्णा लेक येथे सुरु असलेले बांधकाम दर्जेदारच करून घेतले जाणार आहे. नगरपालिका प्रशासन पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.