अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्यातील खास नातं आता कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्यापासून लपलेलं नाही. सनरायझर्स हैदराबादचा हा फलंदाज ज्याने आता भारताच्या टी-20 संघात सलामीवीर म्हणून आपलं स्थान पक्कं केलं आहे, त्याने त्याच्या कारकिर्दीला आकार दिल्याचं आणि यशाचं श्रेय नेहमीच युवराज सिंगला दिलं आहे. दुसरीकडे युवराज सिंगनेही अभिषेक शर्माचं कौतुक करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पंजाब विरुद्ध अभिषेकची विक्रमी 141 धावांची खेळी उदाहरण म्हणून पाहू शकता. हैदराबादच्या या फलंदाजाने युवराजला पाठिंबा दिल्याबद्दल श्रेय दिलं आणि भारताचा 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील खेळाडूने त्याच्या परिपक्वतेबद्दल त्याचं कौतुक केले. पण युवराज सिंग आणि अभिषेक शर्मा एकमेकांना भेटले कसे? युवराजचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग यांच्या मते हा योगायोग नव्हता.
योगराज म्हणाले की, युवराजने पहिल्यांदाच पंजाबमधील विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये अभिषेकच्या प्रभावी कामगिरीची नोंद घेतली आणि लगेचच पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून त्याची आकडेवारी मागितली. पीसीएने त्याचा उल्लेख गोलंदाज म्हणून केला होता हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं.
“जेव्हा आम्ही पीसीए आणि प्रशिक्षकांकडून अभिषेक शर्माच्या कामगिरीची माहिती मागितली तेव्हा ते काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे का? सर तो एक गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करतो. युवराज म्हणाला, ‘तुम्ही फक्त त्याच्या कामगिरीचे रेकॉर्ड पहा’. जेव्हा आम्ही रेकॉर्ड पाहिला तेव्हा अभिषेकच्या नावे आधीच 24 शतकं होती. युवी म्हणाला, ‘तुम्ही चुकीची माहिती का देत आहात? का? या खेळाचूने 24 शतकं ठोकली आहेत’. याला सहा-सात वर्षं झाली,” असं योगराज सिंग यांनी क्रिकेट नेक्स्टला सांगितलं.
योगराज यांनी पुढे सांगितलं की, “युवराजने मला तो रेकॉर्ड पाठवला, आणि मला म्हणाला या खेळाडूला पाहा”. मी त्याला सांगितलं, हे बघ हे सगळं माहिती शेअर करण्यासंदर्भात आहे. नेमकी हीच समस्या आहे. काही लोक एखाद्याचं करिअर करण्याऐवजी फक्त मत्सरापोटी त्या खेळाडूला संपवतात”.
“युवराजने अभिषेक आणि गिल यांना रात्रीच्या पार्ट्यांना जाण्यापासून रोखलं”
योगराज सिंग यांनी यावेळी युवराज सिंगने कशाप्रकारे अभिषेक शर्माला शिस्त लावली याबद्दलही सांगितलं. युवराज सिंगने अभिषेकला रात्री उशिरा पार्ट्यांमध्ये जाण्यापासून आणि गर्लफ्रेंड्सला भेटण्यापासून रोखल्याचं योगराज सिंग म्हणाले.
“रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या, प्रेयसी…मग का झालं? युवराज म्हणाला ‘त्याला लॉक करा.’ त्याचे वडील हाताळू शकत नसल्याने तो युवराज सिंगच्या पंखांखाली आला होता. युवराज एकदा जोरात ओरडला होता. कुठे आहेस? मी त्याला ओरडताना ऐकलं होतं. ‘रात्रीचे 9 वाजले आहेत, झोप जा. तुला समजलं का? मी येत आहे’. यानंतर त्याने फोन दिला आणि झोपायला गेला. युवराजने नंतर पहाटे 5 वाजता उठवण्यास सांगितलं,” असा खुलासा योगराज यांनी केला.