[ad_1]
IPL Points Table RCB And MI Ranking: इंडियन प्रिमिअर लीगच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2025 Points Table) रविवारी म्हणजे 27 एप्रिल रोजी मोठी उलथापालत झाल्याचं पाहायला मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव करत यंदाच्या पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थान मिळवलं आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मिळवलेला विजय हा त्यांच्या संघाचा घरच्या मैदानाबाहेरील सलग सहावा विजय ठरला आहे. सध्या आरसीबीचा संघ हा 10 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसहीत पहिल्या स्थानावर आहे.
आरसीबी पहिल्या स्थानावर
आरसीबीच्या संघाने दिल्लीविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. दिल्लीच्या संघाला पराभूत करत आरसीबीने आपल्या सात विजयांपैकी सहावा विजय हा घराबाहेरील मैदानावर मिळवला. दुसरीकडे दिल्लीच्या संघाची पॉइण्ट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. दिल्लीचा संघ चौथ्या स्थानावर घसरला असून नऊ सामन्यांमधील हा त्यांचा तिसरा पराभव आहे.
मुंबईच्या संघाने मिळवला सहावा विजय
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केलं. या विजयासही मुंबईचा संघ 12 पॉइण्ट्ससहीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. लखनऊच्या संघाचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला असून संघाची सहाव्या स्थानी घरसरण झाली आहे. टॉप पाचमध्ये पंजाबच्या संघाचाही समावेश आहे. नेट रन रेटच्या जोरावर गुजरात टायटन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
पाचव्या सहाव्या स्थानी कोण?
पंजाब किंग्सचा संघ पाचव्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 5 सामने जिंकले असून तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिल्याने पंजाबच्या नावावर 11 पॉइण्ट्स आहेत. सहाव्या स्थानी लखनऊचा संघ आहे. त्यांनी 10 पैकी पाच सामने जिंकले असून पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
तळाचे चार संघ कोणते?
सातव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असून त्यांनी 9 पैकी केवळ 3 सामने जिंकले असून पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. कोलकात्याचा एक सामना अनिर्णित राहिल्याने त्यांच्या नावावर 7 पॉइण्टस आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 9 पैकी 3 सामने जिंकले असून तो आठव्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ नवव्या तर चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे. राजस्थान आणि चेन्नईच्या संघाने त्यांच्या 9 सामन्यांपैकी प्रत्येकी केवळ दोन सामने जिंकले आहेत.
किमान सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक
प्लेऑफसाठी अव्वल चार संघ पात्र ठरणार असून यासाठी सरासरी किमान सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक असतं. सध्याची स्थिती पाहता आरसीबी, मुंबई आणि गुजरातचा संघ प्लेऑफ्समध्ये जाईल अशी दाट शक्यता आहे.
[ad_2]