Rohit Sharma blasts at critics after retirement from Test cricket over his batting

0

[ad_1]

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली असल्याने त्याच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने मोठं यश मिळवलं असलं तरी अनेकदा त्यालाही टीकेचाही तितकाच सामना करावा लागला आहे. फलंदाजीत सातत्य नसल्याने रोहित शर्मा नेहमीच टीकाकारांसाठी लक्ष्य होता. 37 वर्षीय रोहित शर्माला कसोटी आणि आयपीएलमध्ये खासकरुन अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. दरम्यान रोहित शर्माने मुलाखतीत त्याच्यावर झालेली काही टीका ही गरजेची नव्हती असं सांगितलं आहे. 

“टीका होणं हे खेळाडूच्या आयुष्याचा भाग आहे. टीका होणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. पण मी विनाकारण होणाऱ्या टीकेच्या विरोधात आहे. मला ती आवडत नाही,” असं रोहित शर्माने पत्रकार विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. पुढे तो म्हणाला, “माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण मी त्याकडे लक्ष देत नाही आणि मला फरकही पडत नाही”.

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना येणाऱ्या अपयशावरुन होणाऱ्या अनावश्यक टीकेवर रोहित शर्माने भाष्य केलं. पण टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याऐवजी त्याने त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. “माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलण्यात आल्या. म्हणजे मी डावखुऱ्या गोलंदाजांविरोधात खेळू शकत नाही वैगेरे. पण मी आता त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही जर बचाव करण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी चुकीच्या दिशेने जाऊ शकतात. त्यात तुम्ही बराच वेळदेखील घालवाल. वेळ फार महत्त्वाची आहे. माझं काम हल्ला करणं आहे,” असं रोहित शर्मा म्हणाला. 

रोहितला आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानलं जातं. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजारांपेक्षा जास्त आणि कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज देखील आहे.

जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आता त्याचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज शुभमन गिल यांची नावं सध्या चर्चेत आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here