के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

0

कोपरगाव प्रतिनिधी : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांसाठी लिंगभाव व कुटुंब नियोजन जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव पंचायत समितीच्या श्रीमती देवगुणे, नाथबाबा महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर मुळेकर, विख्यात कायदेतज्ञ ऍड. गौरी लोखंडे, फिरोदिया हायस्कूल, वांबोरीच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लोखंडे, सेवानिवृत्त आरोग्यसेविका श्रीमती विजया कोनाळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
             

 श्रीमती देवगुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला सक्षमीकरण व त्याबाबत जनजागृतीची गरज विशद केली. तसेच या कार्यशाळेमागची भूमिका स्पष्ट केली. आरोग्य विषयावर बोलताना श्रीमती विजया कोनाळे म्हणाल्या, की स्त्रियांनी त्यांचे आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य याबाबतीत ग्रामीण भागातील मुलींनी अधिक सजग असणे गरजेचे आहे. यासंबंधी त्यांनी विविध स्तरातील स्त्रियांचे आरोग्य, आजार व त्यासंबंधी घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 
           

कायदेविषयक मार्गदर्शन करताना ऍड. गौरी लोखंडे म्हणाल्या, की आज महिलांना सन्मानाने जगण्याची संधी संविधानाने आपल्याला दिलेली आहे. सती प्रथा, हुंडाबळी, बालविवाह, महिला शोषण याबाबत कायदेशीर आवाज उठवण्याची तरतूद संविधानात आहे. तेव्हा सर्व महिलांनी आपले हक्क व अधिकारांबाबत आग्रही असायला हवे. कार्यशाळेचा समारोप करताना श्रीमती लोखंडे यांनी महिला सक्षमीकरण किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. 
                  कार्यशाळा संपन्न झाल्यावर उपस्थित जवळपास १५० विद्यार्थिनींना नाथबाबा महिला प्रतिष्ठान तर्फे अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जावेद शाह यांनी केले. यावेळी प्रा. मिलिंद कांबळे, प्रा. मयुरी भोसले, प्रा. श्रद्धा खालकर, प्रा. ज्योती लोंगानी आदी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here