श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने ‘स्कुल कनेक्ट 2025’कार्यक्रम संपन्न

0

नवीन नांदेड: श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIE&T), विष्णुपुरी, नांदेड यांच्या वतीने “School Connect 2025” या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आज कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात १२वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग शिक्षण, करिअर संधी, शैक्षणिक धोरणे आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. तसेच, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री . डी. पी. सावंत, संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य संत बाबा सुखविंदर सिंघजी, सौ. राजश्रीताई पाटील, प्रा. डी. डी. डोये, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, भार्गव राजे संचालक, भार्गव करिअर अकॅडमी, नांदेड, प्रा. पी. जी. जाधव, विभाग प्रमुख, केमिकल अभियांत्रिकी विभाग, व प्रा. ललित टोके (समन्वयक, School Connect 2025) उपस्थित होते.

प्रा. डोये यांनी कार्यक्रमाची सुरुवात अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत केली. यानंतर सौ. राजश्रीताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून जीवनात प्रगती साधता येते, हे उदाहरणांसहित मांडले. संत बाबा सुखविंदर सिंघजी यांनी शैक्षणिक वाटचालीत आध्यात्मिक मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. माजी मंत्री . डी. पी. सावंत यांनी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा दृष्टीकोन सांगितला, ज्यांनी नांदेडमध्ये सरकारी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्धार केला होता आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले. तसेच, त्यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक योजनांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी व सुविधांची माहिती दिली. भार्गव राजे  आणि . कोनाळे  यांनी विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग क्षेत्रातील कौशल्ये, प्रगतीच्या संधी समजावून सांगितल्या.

संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी SGGSIE&T संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. संस्थेतील १० विभाग, ६१० विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष प्रवेश क्षमता, दर्जेदार प्रयोगशाळा, प्रगत संशोधन केंद्रे आणि शिक्षण सुविधा यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, संस्थेतील विद्यार्थी दरवर्षी विविध शैक्षणिक स्पर्धा, प्रोजेक्ट स्पर्धा, टेक्निकल फेस्ट्स तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत. संस्थेतील प्राध्यापक संशोधन क्षेत्रात आघाडीवर असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे, तसेच काही प्राध्यापकांनी पेटंट्स प्राप्त केली आहेत. डॉ. कोकरे यांनी अधोरेखित केले की, SGGSIE&T संस्थेमध्ये फक्त शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो — यात नेतृत्वगुण, सॉफ्ट स्किल्स, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश होतो. पुढील पाच वर्षांसाठीच्या संस्थेच्या विकास आराखड्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

प्रा. ए. बी. गोंडे (अधिष्ठाता शैक्षणिक) यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) चे सार व फायदे स्पष्ट करत यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या संधींबाबत माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य शाखेबरोबरच आवडीच्या कोणत्याही क्षेत्रातील मायनर विषय घेण्याची मुभा आहे. NEP 2020 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिक्षण अधिक लवचिक, बहुआयामी, समग्र आणि विद्यार्थीभिमुख करणे असे त्यांनी अधोरेखित केले. शेवटी, डॉ. किरण सानप (प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक) यांनी AICTE अंतर्गत २०२५ साठीच्या B.Tech प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी विविध कागदपत्रांची आवश्यकता, महत्त्वाच्या तारखा व ऑनलाइन फॉर्म भरताना लक्षात घेण्याच्या बाबी स्पष्ट केल्या. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना B.Tech प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष लाभ होत आहे. कार्यक्रमाची सांगता प्रा. जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ. मिलिंद भालेराव यांनी केले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here