सातारा. दि 13: सातारा जिल्ह्यात कृषि क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास भरपूर वाव असून त्या अनुषंगाने कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काही सूचना, मते असतील त्या सांगाव्यात त्याचा शासनस्तरावर उचित पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी विजय माईनकर, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जून महिन्याचा पंधरवडा संपत आला असून देखील पावसाला सुरुवात झालेली नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, अशा परिस्थितीत पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात यावे.
कृषि व आत्मा विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिबीरांचे आयोजन करावे. योजनांच्या माहितीच्या ऑडिओ क्लिप तयार कराव्यात. योजनेचे नाव, योजनेचे स्वरुप, लाभार्थी निवडीचे निकष, देय अनुदान, लाभ, शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करावा इत्यांदी माहितीचा त्यात समावेश असावा. ऑडिओ क्लिप प्रत्येक गावात घंटागाडीच्या माध्यमातून स्पीकर वरुन वाजविण्यात यावी. तसेच व्हॉटस्ॲप च्या माध्यमातून त्याचा प्रसार करावा. तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध लाभांच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केल्या.
या बैठकीमध्ये खरीप हंगाम 2023 साठी उपलब्ध असलेले खते, बियाणे पुरेशा प्रमाणात आहे का याचाही आढावा घेतला.