सातारा/अनिल वीर : New India Literacy Programme नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कु.रुचिता क्षीरसागर ही नऊ वर्षीय चिमुकली आपल्या गायनातून साक्षरतेचा प्रचार करत आहे. तिचा व्हिडिओ केंद्र शासनाने उल्लास या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे आपल्या ७२ वर्षीय निरक्षर सुशीला आजी हिला शिकवतानाच्या तिच्या प्रेरणादायी छायाचित्राची यापूर्वी केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली होती. चालू वर्षी ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनी महाराष्ट्रात नवभारत साक्षरता अभियानाची सुरुवात करण्यात आली. निरक्षर आणि स्वयंसेवक यांच्यासाठी या दोघी आजी नातींचे या छायाचित्र प्रेरणादायी ठरत आहे. त्यांचे मुळगाव टोणेवाडी (ता.बार्शी जि. सोलापूर) असून तीन वर्षांपूर्वी ते बारामतीत स्थलांतरित झाले आहेत. सुशीला आजी मणक्याच्या आजाराने त्रस्त असून त्यांचा साक्षरता वर्ग नातीने घरीच सुरू केला आहे.रुचिता हिने आपल्या आजीला शिकविण्याबरोबरच, ‘हम मिल जुलकर लिखते पढते जाऐंगे’ या हिंदी गीतातून सावित्रीबाईंच्या वेशात साक्षरतेचा जागर सुरू केला आहे. तिचा हा स्तुत्य उपक्रम देशभर पोहोचावा म्हणून केंद्र शासनाने नवभारत साक्षरतेच्या उल्लास फेसबुक पेजवर तिचा हा व्हिडिओ प्रशंसा करीत पोस्ट केला आहे.योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी बारामती येथे त्यांच्या घरी समक्ष भेट देऊन आजी-नातीचा गौरव केला. यावेळी माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, राजेश क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर,आबा जगताप, गौरव माने,सारिका माने,विठ्ठल साळवे आदी उपस्थित होते. रुचिता ही अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असून तिला संगीत शिक्षिका जयश्री कुलकर्णी व सुवर्णा जमदाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
नवभारत साक्षरता अभियानात शाळांनी सर्व्हे करून स्वयंसेवकांच्या मदतीने निरक्षरांना साक्षर करावयाचे आहे.घरातील असाक्षरांना त्यांच्या कुटुंबीयांनी साक्षर करणे अभिप्रेत आहे. कुटुंबात निरक्षर नसतील तर शेजारी असलेल्यांनाही साक्षर करता येऊ शकते. प्रौढ असाक्षरांनी योजनेत सहभागी होऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा आणि राष्ट्रकार्यास मदत करावी.”असे विचार डॉ.महेश पालकर यांनी व्यक्त केले. “सर्वांना जोडण्यासाठी आणि जादुई क्षण विणण्यासाठी संगीताच्या सखोल सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र अभिमानाने ULLAS- नव भारत साक्षरता कार्यक्रम सादर करतो, हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे जो जागरूकता पसरवण्यासाठी कर्णमधुर सुरांचा वापर करतो.एका मनमोहक व्हिडिओमध्ये, एक छोटीशी मुलगी आत्मनिर्भरतेकडे मार्ग मोकळा करून, साक्षरतेचा स्वीकार करण्यासाठी निरक्षरांना कृपापूर्वक आग्रह करते. जागरूकता वाढवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण पध्दती खोलवर प्रतिध्वनित होतात, त्यांचा प्रभाव दूरवर पोहोचतो.एकत्रितपणे, संगीताच्या मंत्रमुग्ध करणार्या भाषेद्वारे, बदलाची प्रेरणा देतात आणि जीवन सशक्त करतात.” असेही केंद्र शासनाच्या उल्लास या फेसबुक पोस्टचा मराठी अनुवाद आहे.